महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकाराची राज्यात एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोविडच्या या प्रकाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कोविड बाधिताला ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एक ऑक्सिजन बेड राहणार आहे.जिल्ह्यातील ४९ हजार ४३० व्यक्तींना आतापर्यंत कोविडचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४८ हजार ९७ व्यक्तींनी कोविडमुक्त झाले असून १ हजार ३२७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती कमी असली तरी डेल्टा पेक्षाही जास्त प्रभावी असलेल्या ओमायक्रॉनचे संकट वर्धा जिल्ह्यावर आहे. कोविडच्या याच प्रकाराला ब्रेक लावण्यासह त्याच्याशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक इमर्जन्सी ऑक्सिजन बेडची व्यवस्था राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन मेडीकल ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा वापर गंभीर रुग्णांसाठी केला जाणार आहे.
पीएससीतच राहणार कोविड केअर सेंटर- कोविडची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने काही उपाययोजना केल्या होत्या. कोविडची दुसरी लाट ओसरल्यावर शाळा सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा रुग्ण खाटांचा समावेश असलेले कोविड केअर सेंटर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जि. प. चा आरोग्य विभाग कामाला लागला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हेच कोविड केअर सेंटर कोविडचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉनला हरविण्यासह कोविड संकट काळात प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्तच ठरणार आहे.
पुर्वी कोविड केअर सेंटर मध्ये होता शाळा अन् वसतिगृहांचा समावेश- कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान जिल्ह्यात २१ तर दुसऱ्या लाटेदरम्यान १९ कोविड केअर सेंटर होते. त्यापैकी एक कोविड केअर सेंटर अजूनही कार्यरत आहेत. असे असले तरी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल १६ निवासी शाळा तसेच वसतिगृहांचा समावेश होता. पण आता शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातच प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा खाटांचे कोविड केअर सेंटर तयार होणार आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक काेविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा रुग्ण खाटांचे कोविड केअर सेंटर राहणार असून प्रत्येकी एक इमर्जन्सी ऑक्सिजन बेड राहणार आहे.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. वर्धा.