समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयातील विहिरीने तळ गाठल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे. याचा त्रास येथे येत असलेल्या रुग्णांना सहन करावा लागतो आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना घरून पाणी आणावे लागत आहे. कुलर बंद असल्याने तळपत्या उन्हात उष्णतेत दिवस काढण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. रुग्णालयाला पाणी पुरविण्याकरिता विहीर आहे. याच विहिरीतून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलाही पाणी पुरविल्या जात आहे. येथे पाणी नसल्याने कर्मचारीही निवासस्थानी राहण्यास तयार नाही. रुग्णालयातील रुग्णांना पाणी मिळावे याकरिता आठवड्यातून एकवेळा विहिरीत पाणी सोडले जात आहे. होत असलेला पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णालयाकरिता बांधकाम खात्याने नवीन निवासस्थान निर्माण केले आहे. तेथे असलेल्या विंधन विहिरीला भरपूर पाणी आहे; परंतु ती रुग्णालय प्रशासनाला हस्तांतरीत करण्यात आली नाही. यामुळे रुग्णालयाला पाणी मिळत नाही. शिवाय स्थानिक नगर पंचायत प्रशासन रुग्णालयाला पाणी देण्यास तयार नाही. ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाईमुळे आॅपरेशन व इतर कामांचा खोळंबा झाला आहे. येथे नाक दाबून बुक्याचा मार सहन करीत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी काम करीत आहेत. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी मात्र उदासिन आहे.(तालुका प्रतिनिधी) पाण्याअभावी कुलर बंद ४रुग्णालयात पाण्याचा तुटवडा असल्याने येथील हॉलमध्ये असलेले कुलर बंद करण्यात आले आहे. रुग्णांना उष्णतेत राहावे लागत आहे. ४या रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांकरिता सात निवासस्थान आहे; मात्र येथे पाणी नसल्याने त्यांनी येथे थांबण्यास नकार दिला असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णालयातील पाणी टंचाई निवारण्याकरिता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तो दररोज होणे गरजेचे आहे. - डॉ. धर्मपाल खेडकर, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूरग्रामीण रुग्णालयाने नगरपंचायतला मागणी केल्यास त्यांना पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करू. याकरिता रस्ता आडवा आल्याने बांधकाम खात्याची परवानगी घेत तो फोडून पाईपलाईन टाकण्यात येईल. - गजानन राऊत, सभापती, पाणी पुरवठा नगर पंचायत, समुद्रपूरपाईप फुटल्याने पाण्याचा अपव्यय ४नारायणपूर- समुद्रपूर पंचायत समितींतर्गत येत असलेल्या नारायणपूर येथे सन १९८६ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू झाली. या योजनेतून गावाला पाण्याचा पुरवठा होत आहे. या वर्षी गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असताना येथील पाईपलाईन फुटल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्य होत आहे परिणामी टाकीत पाणी जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ४याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी पाईप लाईन कालबाह्य झाल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे सांगितले आहे. ती लवकर दुरुस्त करण्यात येईल, असे सरपंच युवराज तान्दुलकर यांनी सांगितले आहे.(वार्ताहर)
समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याअभावी रुग्णांचे हाल
By admin | Published: April 05, 2016 4:38 AM