पुरवठा विभागाच्या गोदामाचा वापर : शेतकरी उत्पादक कंपनीकडे व्यवस्थापन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्षभर शेतात राबल्यावर शेतकरी जेव्हा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणतो त्यावेळीच नेमके शेतमालाचे भाव पडतात. व्यापाऱ्यांच्या एकीमुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना वेगळ्या बाजारपेठेचे पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित दि रूरल मॉल शेतकऱ्यांसाठी उभा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून हा मॉल साकार होणार आहे. यासाठी मुख्य रेल्वे स्थानकासमोरील पुरवठा विभागाचे अनेक दिवसांपासून बंद असलेले ६ हजार चौरस फुट जागेच्या गोदामची जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरवठा विभाग ही जागा आत्मा प्रकल्प संचालक यांना उपलब्ध करून देणार आहे. शहराच्या मुख्य ठिकाणी हा मॉल उभा राहणार असून ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा मॉल शेतकरी उत्पादक कंपनीला चालवायला देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी अगदी वाजवी भाडे आकारण्यात येईल. यासाठी ६ उत्पादक कंपन्यानी प्रस्ताव दिला असून त्यांना व्यवस्थापनांचे सादरीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांंनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत कार्यकारी समिती गठित करण्यात आली. यात आत्मा, केम, माविम, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नाबार्ड या विभागातील अधिकारी तसेच बजाज फाऊंडेशनचा समावेश असेल. ही समिती मॉलच्या व्यवस्थापनासाठी येणाऱ्या अडचणींवर विचार विनीमय करून तोडगा काढेल. येत्या १ आॅगस्ट ला सदर मॉल वर्धेकरांच्या सेवेत आणण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. शेतकरी उत्पादक गटाकडून उत्पादित शेतीमाल व प्रक्रियायुक्त पदार्थाना एकाच ठिकाणी व्यासपीठ मिळेल. या माध्यमातून विना पॉलिश डाळ, सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत शेतमाल अशी गुणवत्तापूर्ण उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. शेतकरी उत्पादित मालाचे पूरक ब्रॅन्डींगही करण्यात येईल. येथे शेतमाल विक्रीला आणावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी होणार ‘रूरल मॉल’
By admin | Published: July 06, 2017 1:18 AM