लाेकमत न्यूज नेटवर्क घोराड : सेलू तालुक्यात चार धरणांचा समावेश आहे. या धरणांना पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त होत आहे. पण यापैकी असणाऱ्या रिधोरा धरणाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. हे धरण यावेळी पूर्णतः भरले असल्याने पाणी धरणाच्या भिंतीवरून वाहते. पाण्यात डुंबण्याचा हा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करीत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने येथे गर्दी टाळण्यासाठी काहीवेळा उपाययोजना केल्या. पण या उपाययोजना कायमस्वरुपी दिसून येत नाही. शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही. या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. अनेक जण येथे सेल्फीही काढण्यात दंग दिसून येतात. पण येथे गर्दी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जबाबदारी असलेला पाटबंधारे विभाग मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात पर्यटनाला वाव असतानासुद्धा संबधित विभाग याचा विकास करण्यास दुर्लक्ष करीत आहे. या धरणावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
तो फलक नावापुरताधरणावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर प्रशासनाने लाकडी कुंपण घातले व त्यावर फलक लावला. त्या फलकावर कोणीही गर्दी करू नये व वाहन जप्त करण्याची सूचना करून कारवाई करण्यात येईल, असे लिहिले असले तरी त्या फलकाजवळच पर्यटकांची वाहने उभी राहत आहेत. त्यामुळे हा फलक नावापुरताच असल्याचे दिसून येत आहे.