अनेकांनी स्वत: काढले अतिक्रमण : भेदभावपूर्ण कारवाई टाळण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शहरातील मुख्य मार्गाने लहानमोठ्या दुकानदारांनी कलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती. न.प.च्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या पुढकारात अतिक्रमण हटविण्याची मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. यामुळे अनेक बेरोजगारांच्या रोजगारावर गदा आली. शहरातील बसस्थानक, बाजार, वडगाव व पोलीस ठाण्याच्या मार्गावरील अनेकांकडून दुकानासमोर टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केले होते. अनेक बेरोजगारांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले होते. या सर्वांचे अतिक्रमण काढण्याचा आजपासून प्रारंभ झाला. कार्यवाही सुरू असताना काही व्यवसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वत:च अतिक्रमण काढून घेतले. सर्व अतिक्रमणग्रस्तांना मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नियमानुसार नोटीस बजावल्या होत्या. त्याचप्रमाणे अतिक्रमण धारकांची एक सभा घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई होत असून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यात मोजक्याच लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. दुपारी अतिक्रमण हटविणारा जेसीबी बाजार ओळीत उभा होताच त्याचे चाक पंक्चर झाल्यामुळे कारवाई मंदावली. यामुळे बरेच अतिक्रमण अजून हटले नाही. त्यामुळे त्यांना अभय तर दिल्या जात नाही ना? अशी चर्चा आहे. अतिक्रमणाची कार्यवाही करताना भेदभाव करण्यात येवू नये, अशी सर्वांची मागणी आहे. मुख्याधिकारी जाधव यांच्या पुढकारात ही कारवाई झाली. हा पहिला टप्पा असून पुन्हा लगेच राहिलेले अतिक्रमण हटविण्यात येईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. यावेळी ठाणेदार संजय बोठे स्वत: उपस्थित राहत चोख बंदोबस्त ठेवला होता. छोट्या व्यवसायिकांना टिनाचे ठेले नालीवर स्लॅब टाकून त्यावर उभे करून देवू व त्यापोटी त्यांच्याकडून नाममात्र अनामत व तीनशे रुपये प्रतिमहिना किराया घेण्याचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेवला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार तसे करता येत नसल्याचे म्हणत प्रस्ताव फेटाळला. हा प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी संमती दिली असती तर गरिबांचा व्यवसाय सुरू राहून नगरपंचायतीचे उत्पन्न वाढले असते. - डॉ. राजेश जयस्वाल, अध्यक्ष नगरपंचायत, सेलू. आज कारवाईचा पहिला दिवस आहे. जेसीबीच्या चाकात धारदार टाईल्सचा तुकडा घुसला. त्यामुळे तो पंक्चर झाला. या कारणाने मोहीम मंदावली. मात्र कुठलाही भेदभाव न करता सर्वांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाईल. - अंकुश जाधव, मुख्याधिकारी नगरपंचायत, सेलू
सेलूत चालला बुलडोजर
By admin | Published: May 13, 2017 1:09 AM