लोकमत न्यूज नेटवर्कसेल़ू/घोराड : वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवारी, १४ जुलै रोजी होणार आहे. सेलू येथे शहराच्या मध्यवर्ती भागात राज्य परिवहन महामंडळाचे जुने बसस्थानक आहे. याशिवाय बरीच मोठी जागा परिवहन महामंडळाच्या मालकीची आहे. या ठिकाणी नवे आधुनिक सुविधांनी सज्ज असे बसस्थानक तयार केले जाणार आहे. या बसस्थानकाच्या संपूर्ण परिसराचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे.आधुनिक शेरा पॅनल फॉल सिलींग सुविधा उपलब्ध होणार आहे. शुद्ध वातावरणाकरिता बगीचाची निर्मिती करण्यासोबतच प्रतीक्षा हॉलचे आधुनिकीकरण, ग्रामीण विभागाकरिता नवीन सात प्लॅटफॉर्म, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, भरपूर क्षमता असलेले एक सेप्टीक टँक, दर्शनी भागात आकर्षक वॉल कम्पाऊंड, डिजिटल एलईडी डिस्प्ले, मजबूत व आकर्षक फ्लोरिंग, टू-व्हीलर पार्किंगकरिता विशेष व्यवस्था, प्रवाशांच्या सुविधेकरिता विविध दुकानांची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेकरिता स्वतंत्र पोलीस चौकी, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता गेस्ट रूम, (स्त्री व पुरुष), महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह, कॅन्टीनचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.वर्धा बसस्थानकाचे आज लोकार्पणवर्धा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळाही रविवारी वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा जाहीर नागरी सत्कार बसस्थानक परिसरात आयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ना. सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, सुधीर दिवे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.सेलूतील प्रवाशांच्या अपेक्षासेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नवे अत्याधुनिक बसस्थानक केले जात आहे. मात्र, सध्या असलेल्या जुन्या बसस्थानकात मागील २० वर्षांपासून जलद बसचे दर्शन झालेले नाही. सर्व जलद गाड्या वळणमार्गावरून सरळ निघून जातात. या बसस्थानकावर केवळ बोरधरण, आमगाव, झडशी या ग्रामीण बसगाड्याच थांबा घेतात. वर्धा नागपूर मार्गावरील या बसस्थानकावर जलदगाड्यांचा थांबा मिळावा, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. तसेच नागपूर-तुळजापूर मार्गाचे रूंदीकरण झाल्याने सेलूपासून हे अंतर खूप दूर झाल्या आहे. त्यामुळे बसगाड्या सेलू बसस्थानकात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तीन कोटी रुपयांच्या निधीतून सेलूत अत्याधुनिक बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:28 PM
वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ठळक मुद्देवित्तमंत्री करणार आज पायाभरणी । मुनगंटीवार यांचा नागरी सत्कार होणार