पत्रपरिषद : राजकीय पक्षाच्या मान्यतेनंतर केली घोषणा वर्धा : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्षाची घोषणा केली असून आगामी सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातही सर्व ५२ जिल्हा परिषद आणि १०४ पंचायत समितीसाठी त्यांचे उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील घराणेशाहीकृत पक्षांना संभाजी ब्रिगेडने आव्हान दिले होते. यासाठी महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पदवीधर मतदार संघ व भविष्यातील सर्व निवडणुका पक्ष लढविणार आहे. गत २० वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने अनेक सामाजिक आंदोलने केली. अनेकदा आक्रमक आंदोलने केली. राज्यात ओळख निर्माण केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा, तालुका, सर्कल व गावोगावी शाखा आहे. गत एक वर्षांपासून राजकीय दृष्टीने ब्रिगेड काम करीत आहे. त्या अनुषंगाने ३० नोव्हेंबर रोजी मुंबई येथे पक्षाची घोषणा करण्यात आली. ‘शेतकऱ्याच्या मालाला भाव व दारूमुक्त गाव’, हे ब्रिद घेऊन संभाजी ब्रिगेड काम कारणार आहे. स्त्री शिक्षणासाठी ब्रिगेड सदैव अग्रेसर राहणार आहे. शिवाजी महाराजांना अभिप्रेत शिवराज्य आणावयाचे आहे. यासाठी घराणेशाहीविरूद्ध संघर्ष करावा लागणार आहे. यामुळेच आगामी सर्वच निवडणुका लढविण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतल्याचेही डॉ. पारधी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वर्धा निरीक्षक विनोद हागोणे, जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, सचिव वैभव तळवेकर, कार्याध्यक्ष तुषार उमाळे, अतुल शेंदरे, रूपेश भोयर, राहुल बोबडे, समीर खान, मनोज गायकवाड, प्रशांत रोकडे, मनीष हिवरकर, पंकज साळवे, रूपेश वाघमारे उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार
By admin | Published: December 29, 2016 12:42 AM