शेतकऱ्यांत समाधान : पिके बहरलीआष्टी (श.) : तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच ३० आॅगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने सर्व पिकांना संजीवनी मिळाली आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सातत्याने दीड महिना हजेरी लावणाऱ्या पावसाने तीन आठवडे विश्रांती घेतली होती. सोयाबीन, भूईमुंग पिकासह अन्य पिके फुलासह पोषक अवस्थेत असताना कडक उन्हामुळे सोयाबीनसह भूईमुंग पिकांना पाण्याची नितांत गरज होती. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या. उशीरा का होईना ३० आॅगस्टला मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला आणि शेतकरी सुखावला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. परिसरातील सर्व पिके बहरू लागली आहेत. केवळ पावसाअभावी वाया जाणारी पिके आता समाधानकारक दिसत असल्याने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन समस्या निकाली काढली होती; पण सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पाण्याचा तीन आठवड्याचा खंड पाहून चिंतीत झाले होते. येथील चुनखडीयुक्त जमीन असल्याने परिसरात पाण्याची नितांत गरज होती. ती गरज मंगळवारी आलेल्या जोरदार पावसाने पूर्ण केली. यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातात आला आहे. पूढे पिके घरी येईपर्यंत काय होणार, हे सांगता येत नसले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापुढे पावसाने अधून -मधून हजेरी लावली तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट भरून निघू शकते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
पावसामुळे पिकांना संजीवनी
By admin | Published: September 04, 2016 12:37 AM