प्रकाश महाराज वाघ : चर्चासत्रात राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर भरआष्टी (श.) : भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे. शेतीला बदलत्या वातावरणाप्रमाणे अद्ययावत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची संजीवनी आवश्यक आहे. त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेली प्रत्येक ओवी आज सार्थ ठरते, असे मत गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्था तळेगाव (श्या.पं.) यांच्यावतीने ‘राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील शेतकरी व शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विजय मुडे तर अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिर्री गावाचे नागरिक अरुण विधळे, महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष राहुल ठाकरे, उपाध्यक्ष विनायक धोंगडी, शरद पाराशर, अप्सर खा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आष्टी तालुक्यातील शिर्री येथील शेतकरी पूत्र अरुण विधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याता आला. विधळे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासकीय सेवा मिळते. तेव्हा जीवनभर प्रामाणिक सेवाव्रत कायम ठेवण्याची प्रेरणाही मिळते. जीवनात जिद्द, चिकाटी, साहसी वृत्ती आणि प्रामाणिकपणा या चतुसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुडे यांनी तळेगाव कुक्कुटपालन संस्था संपूर्ण राज्यात प्रथम असून तिला मिळालेला पुरस्कार ठाकरे कुटुंबियांचे परिश्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल ठाकरे यांनी केले. संचालन अनिल निस्ताने यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पाराशर यांनी मानले. चर्चासत्राला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
प्रगत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान संजीवनी
By admin | Published: September 26, 2016 2:19 AM