सेवाग्राम (वर्धा) : गांधी विचारक आणि सर्वोदयींची मातृसंस्था असलेल्या सर्व सेवा संघाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच उफाळून आला आहे. यामध्ये अद्याप समेट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष आबा कांबळे यांनी सर्व सेवा संघाच्या एकतेसाठी रविवारपासून सेवाग्राम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत झारखंडचे डॉ. विश्वनाथ आझाद हेसुद्धा आहेत.
सर्व सेवा संघाचे दोन गट पडले असून, ते कायदेशीर आहेत की नाही, यासंबंधी प्रकरण धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. सर्व सेवा संघ व सर्वोदय संघटन एकसंघ राहावे म्हणून काही समन्वयवादी लोक काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. पण, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल आणि त्यांच्या गटाचे लोकं मानायला तयार नाहीत. सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष महादेव विद्रोही यांच्या गटाने आबा कांबळे यांना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बनविले. सर्व सेवा संघ एक होऊन एकमताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचा अध्यक्ष निवडेल. आश्रम प्रतिष्ठानचा कारभार सांभाळेल, अशी आबा कांबळे यांची भूमिका आहे. ३० जानेवारी २०२१ रोजी सर्व सेवा संघ परिसरात आबा कांबळे यांनी सर्व सेवा संघांच्या दोन्ही गटांच्या एकतेसाठी उपोषण केले होते. नंतर मात्र दोन गटांचा समेट करण्यासाठी एका गटाने वेळच दिला नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारीला सेवाग्रामच्या जुन्या वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आबा कांबळे यांनी उपोषणाला सुरुवात केल्याचे सांगितले.
काय आहे कांबळे यांची मागणी
न्यायालयातील दावे मागे घ्यावेत, सर्वांनी मिळून सर्व सेवा संघाचे अधिवेशन घ्यावे, एकमताने सर्व सेवा संघाची कार्यकारिणी दोन्ही गटाने बसून ठरवावी. सर्व सेवा संघाचा आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचा अध्यक्ष सर्व संमतीने आणि नियमानुसार करावा, अशा चार प्रमुख मागण्या उपोषणकर्ते आबा कांबळे यांच्या आहेत.
अध्यक्षपदासाठी सत्याग्रहाचा मार्ग अयोग्य : आशा बोथरा
आमचे सहयोगी आबा कांबळे यांची मी आणि मंत्री प्रदीप खेलूरकर यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. आबा उपोषणाला बसणार असल्याने बापूकुटीत वंदन करायला येतील म्हणून आम्ही त्यांची प्रतीक्षा केली. पण, ते आले नाहीत. आमचा कुठलाही असा गट नसून गांधी, विनोबा यांना मानणारे आहोत. सर्व सेवा संघ आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान संविधानाला अनुसरून कार्यकारिणी बनली आहे. न्यायालयात महादेव विद्रोही आणि त्यांचा गट गेलेला आहे. त्यांच्यामुळे सर्व सेवा संघाची खाती बंद झाल्याने अनेक आर्थिक समस्या भेडसावत आहेत. आम्ही बसायला तयार होतो आणि आहोत. पण, त्या गटातीलच नेतृत्व करणारे महादेव आणि सहयोगी बसायला तयार नाहीत. सर्व सेवा संघाने पाच लोकांची समिती बनविली आहे. ती चर्चा करायला तयार आहे. आम्हाला दोषी ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष बनावे, यासाठी सत्याग्रह मार्गाचा अवलंब योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सेवाग्राम आश्रमच्या अध्यक्षा आशा बोथरा यांनी दिली.