लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज आणि इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषधार्थ शहरातून मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांनी केलेल्या वर्धा बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर केले. मुंबई येथे दि. १२ मे ला प्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर झालेला चाकूहल्ला तसेच इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोळकर, काँ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. या हत्यांच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस अजूनही पोहोचले नाही. अशात दोन प्रबोधनकारांच्या हत्यांचा प्रयत्न झालेला आहे. यासह विविध संघटनांच्या माध्यमातून व्याख्यान, लेखन, परिवर्तनाचे कार्य करणाऱ्यांना धमक्या देणे, त्यांची बदनामी करणे, आर्थिक कोंडी करणे असे प्रकार वाढत आहे. या प्रकाराचा निषेध मोर्चातून करण्यात आला. या आवाहनाला वर्धेतील सर्व विद्यार्थी, महिला, शिक्षक तसेच सामाजिक संघटना, सर्व व्यापारी व विक्रेता संघांनी पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. निषेध मोर्चाचा प्रारंभ सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला. मोर्चा सोशालिस्ट चौक मार्गे जात मुख्य बाजारपेठ, इतवारा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत नेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. प्रबोधनाचे कार्य करणाऱ्यांवर हल्ले करण्यामागे सूत्रधार कोण आहे, याचा तात्काळ शोध प्रशासनाने लावावा. यातील आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कट्टरतावादी, सनातनी प्रवृत्तीचा शोध घेऊन राज्य सरकारने शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणारे पुरोगामी विचारवंत व प्रबोधनकारांना संरक्षण देऊन समाजातील खल प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात श्री गुरुदेव सेवा मंडळ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, डॉ.आंबेडकर स्टूडंटस असोसिएशन, मराठा सेवा संघ, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वतंत्र विकास संघटना, समता सामाजिक युवा संघटना, सह्याद्री यूथ फाउंडेशन, सत्यशोधक समाज, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय युवा संघटन, शिव संस्कार ग्रुप, प्रहार विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र अंनिस, समता परिषद, शेतकरी संघटना, श्रमिक पत्रकार संघ, सत्यशोधक समाज, युवा सोशल फोरम, कुणबी स्वराज्य विद्यार्थी महासंघ, अध्ययन भारती, अवकाश निरीक्षण मंडळ, आम्ही वर्धेकर, आंबेडकर टिचर्स वेलफेअर असोसिएशन, निर्माण फाउंडेशन, लॉर्ड बुद्धा मैत्री संघ, अ.भा. किसान सभा आदी संघटना सहभागी होत्या.
सत्यपाल महाराज व श्रीमंत कोकाटे हल्ल्याविरोधी निषेध मोर्चा
By admin | Published: May 31, 2017 12:49 AM