लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविणाऱ्यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपये तर राज्यभरातील दहा जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार दिल्या जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्तांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला तसे निर्देशही दिल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यास नक्कीच मदत मिळेल हे मात्र तितकेच खरे. शहरासह जिल्ह्यातील विविध गावांतून जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच महामार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविले जातात. सर्वात जास्त अपघात हे महामार्गावर होत असून अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. मात्र, आता अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्यासाठी मृत्यूंजय दूताचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचे कामही सुरु असून अपघात रोखण्यासाठी मदत होत आहे.
८६ जणांचा बळी रस्ते अपघातात
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७२ जीवघेणे अपघात झाले असून अपघातात तब्बल ८६ जणांचा नाहक बळी गेल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर १४३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अनेकांना वेळेवर मदत न मिळाल्याने जीव गेला.
जिल्हास्तरावर पाच हजार, सन्मानचिन्ह - अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविल्यास त्या नागरिकाला जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. - महामार्गावर मृत्यूंजय दूतांकडून ही अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे.
राज्य स्तरावर दहा जणांना लाखाचा पुरस्कार- अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचवून रुग्णालयात पाठवून मदत करणाऱ्याला राज्यस्तरावर ही पुरस्कृत केले जाणार आहे. - राज्यातील दहा जणांची निवड करुन त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास एकप्रकारे मदत मिळणार हे मात्र तितकेच खरे.
जिल्हास्तरीय समित्या नेमण्याचे निर्देश
अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे.
परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे स्वागत आहे. अद्याप वाहतूक विभागाकडे कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.मात्र, अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना पुरस्कार देणे हा चांगला निर्णय असून जीव जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. - रवींद्र रेवतकर, एपीआय. वाहतूक.