लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी सुरुवातीला कोरोनाच्या प्रादुर्भाव तर आता पूर परिस्थितीने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून या परीक्षेकरिता पाचवी आणि आठवीच्या ६ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शिक्षण विभागही सज्ज आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यभरात कोरोनाची स्थिती आटोक्यात येताच ८ ऑगस्टला परीक्षा घेण्यास राज्य परीक्षा परिषदेचे मान्यता दिली. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ८ ऑगस्टला केंद्र शासनामार्फत सेंट्रल पोलीस फोर्स या पदाची लेखी परीक्षा होणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करून तालुकानिहाय परीक्षेचे तयारी पूर्ण केली. या परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैपासून संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले. पण, आता ९ ऑगस्ट हा आदिवासी दिन असल्याने या दिवशी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली. अशातच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने विद्यार्थ्यांच्या दळणवळणात अडचणी निर्माण होणार असल्याचे काही संघटनांकडून निवेदन प्राप्त झाल्याचे कारण देऊन ही परीक्षा १२ ऑगस्ट घेतली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. या परीक्षेकरिता आधीच निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचेही राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ओळखपत्रानुसारच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार.
दोन पाळीत ७४ केंद्रांवर होणार परीक्षाजिल्ह्यातील एक हजार शाळांमधील पाचवी आणि आठवीच्या ६ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७४ परीक्षा केंद्र राहणार असून सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन पाळीमध्ये परीक्षा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
दहा भरारी पथकाचा राहणार वॉचआठही तालुक्यामध्ये आठ तर जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात दोन पथकांचा वॉच असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा केंद्रावर सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता शिक्षण विभागाने घेतली आहे.