सेलू : गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश शाळांना अजूनही संरक्षक भिंतच नसल्याचे दिसून येत आहे. घोराड येथील कन्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने बाभळीची झाडे संरक्षकाचे काम करीत आहे.भिंत नसल्याने रस्त्याच्या कडेला व परिसरात सरपणाचे ढीग लावले जात आहे. मोही येथील शाळेला बोरधरण रस्त्यालगत एकच संरक्षक भिंत आहे. संपूर्ण परिसराला भिंतीची गरज आहे. परिसरातच लहान मुले येथेच शौचालयास बसत असल्याने दुर्गंधीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. रेहकी येथील शाळेला वर्दळीच्या रस्त्याकडून तारांचे कुंपण असले तरी वर्षभरापूर्वी प. स. चे तत्कालीन उपसभापती उल्हास रणनवरे यांनी शाळेच्या समारंभात येथील संरक्षक भिंतीकरिता २ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही निधी मिळाला नसल्याचे बोलल्या जात आहे. जूनगड, ब्राह्मणी आदी शाळेच्या इमारतीसुद्धा सुरक्षा भिंतीविनाच असल्याने शाळा सुटल्यानंतर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. जि.प. व प.स. च्या सदस्यांनी या कामासाठी गत काही वर्षापासून लक्षच दिले नसल्याची ओरड पालक व ग्रामस्थ करीत आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीकडे आता खरोखरच लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय याकडे पालकांच्या नजर लागल्या आहे.(शहर प्रतिनिधी).
शाळेच्या इमारती संरक्षक भिंतीविना
By admin | Published: December 31, 2014 11:29 PM