वर्धा : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यानंतर सोमवारी शाळेचा पहिला ठोका पडला. शाळेच्या पहिल्याच दिवसाला हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता अन् मुलाला शाळेत पोहचविण्यासाठी पालकांची सकाळपासूनच लगबग सुरू असल्याचे दिसून आले. नवागतांसह नियमित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकही सज्ज होते. विद्यार्थ्यांच्या आगमनाने आतापर्यंत ओस पडलेली शाळांची इमारत अन् मैदाने पुन्हा गजबजलेली दिसून आली.इयत्ता पहिली, पाचवीत, प्रवेश घेणाऱ्या नवागतांसाठी शाळेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. या नवागतांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर कुठे मुलांच्या सहभागाने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत पावसानेही उघडीप दिल्याने शाळेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता आयोजित केलेले सर्व उपक्रम विनाअडथळा पार पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाचे वातावरण दिसून आले. अशातच शाळा सुटताना आलेला पाऊस या आनंदावर आणखी मजा देणारा ठरला. शाळेचा पहिला दिवस, दुपारपर्यंत सर्व मित्रांच्या भेटी झाल्या, पाहात पाहता शाळा संपल्याची घंटा वाजली अन् पाऊस सुरू झाला. मग त्यात ओले होतच विद्यार्थ्यांनी घर गाठले. (स्थािनक प्रतिनिधी)कुठे रडारड अन् कुठे उत्सुकता ४आतापर्यंत घरी बागडणाऱ्या चिमुकल्यांकरिता शाळेचा पहिला दिवस उजळला. त्यांच्याकरिता शाळा अनोळखीच. शाळेत काय होईल याची पुसटशी कल्पना त्यांना नाही. यामुळे शाळेच्या मुख्य द्वाराजवळ अनेकांची रडारड झाली. तर शाळा सुटताच सकाळी रडणाऱ्या आपल्या चिमुकल्याला कवटाळण्याची उत्सुकता पालकांच्या चेहऱ्यावर होती.पहिल्याच दिवशी नवीन ‘ड्रेस’४शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. अनुदानित व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेंतर्गत गणवेश देण्यात येतो. मात्र काही विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन ड्रेस न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. कोऱ्या वह्या, नवीन पुस्तके४शाळेच पहिल्या दिवशी कोऱ्या वह्या आणि नवीन पुस्तके मिळणार असल्याने प्रत्येकजण हरखून जातो. त्या पुस्तकाच्या पानांचा सुगंध कधीही न विसरणारच. नवीन पेन, पेन्सील, नवा कंपास बॉक्स, अशी सगळी नव्याची नवलाई या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
शाळा गजबजल्या
By admin | Published: June 28, 2016 1:47 AM