श्रीकांत तोटेलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या चार मुलभूत गरजा सर्व शिक्षण अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक शेत शिवार, तांडे येथे बाहेर जिल्ह्यातून दाखल झालेले ऊसतोड कामगारांचे कुटुंब मुलाबाळांसह आले आहे. त्यामुळे त्यांची मुले शाळाबाह्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामगारच्या मुलांना विचारले असता सध्या शाळेला सुट्ट्या असून अभ्यासही नाही. पण, मोबाईलवर शाळा भरणार असल्याचे मॅडमने आम्हाला सांगितलेच नाही, असे सांगितले. त्यामुळे ही मुले देखील शिक्षणापासून वंचित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वस्ती शाळेच्या नियोजनाची गरज आहे.जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमाेहीम सुरू असून एकही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, उस तोडणीसाठी यवतमाळ, पुसद, दारव्हा, दिग्रस, बिड येथील उसतोड कामगार दरवर्षी मुलाबाळांसह येतात ज्याच्या शेतातील ऊस तोडायचा आहे त्याच्याच शेतात झोपडी उभी करून समुहाने राहतात. त्यांच्या ठेकेदाराने त्यांना आगाऊ पैसे देऊन आणलेले असते. दिवाळीनंतर हे कामगार येत असल्याने त्यांची मुलबाळं शाळेपासून वंचित राहतात. ऊसतोड एप्रिलपर्यंत चालत असल्याने त्या कालावधीत मुलांची शाळाही बंद होते. अशावेळेस त्यांच्या शिक्षणाचे काय? ज्या शाळेत ही मुल असतात त्या शाळेतील शिक्षकांनी अशांची माहिती शासनास किंवा संबंधित शिक्षण विभागास देणे गरजेचे आहे. हजेरीपटावर त्यांना हजर दाखवून जबाबदारी शिक्षकांकडून झटकली तर जात नाही ना, असा संशय येतो. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी फक्त गावात, शहरात शोध मोहिम राबविली जाते. शेत शिवार, तांडे मात्र या शोधमोहिमेपासून वंचित असतात. इथेच मात्र दुर्देवाने शाळा बाह्य विद्यार्थी संख्या मोठी असते.महागाव तालुक्यातील शिवानी निरंजन खंडारे (११), योगेश खंडारे (७), सोहम सुनिल रंगारी (८) हे तेथील जि.प. शाळेतील विद्यार्थी सध्या आई वडिलांसोबत सुरगाव शिवारातील उसाच्या शेतातील झोपडीत राहतात. चार महिन्यापासून ते इकडे असल्याने त्यांचा शाळेशी, ऑनलाईन शिक्षणाशी व पर्यायाने पुस्तकाशी संपर्क तुटला आहे. त्यांच्या शिक्षणाची कशी व्यवस्था होईल हे बघणे गरजेचे आहे.
जोडीला ५० हजार रूपये ॲडव्हॉन्स मिळतो. आमच्या भागात दिवाळीनंतर कामे नसल्याने आम्ही ऊस तोडणीसाठी येतो. कोरोनामुळे शाळा बंद आहे. ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. पोटासाठी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.- निरंजन खंडारे, ऊसतोड कामगार, रा. साई, जि. यवतमाळ.
मागील वर्षी मी पाचव्या वर्गात होते. यावर्षी तर शाळाच सुरू झाल्या नाही. पुस्तकेही मिळाली नाही. यावर्षी शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे अभ्यासही नाही. मात्र, मोबाईलवर शाळा भरणार असल्याचे आमच्या मॅडमने आम्हाला सांगितलेच नाही.- शिवानी खंडारे, विद्यार्थिनी रा. साई,जि. यवतमाळ.