प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात झाल्यास जबाबदार कोण पिंपळखुटा : आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या तरोडा व पिंपळखुटा येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या जिर्ण झालेल्या जुन्या इमारती अद्याप पाडण्यात आलेल्या नाही. मुले या परिसरात मधल्या सुट्टीत खेळत असल्याने त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे. सदर इमारती पाडण्याची गरज व्यक्त होत आहे. पिंपळखुटा व तरोडा येथे १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. दोन्ही मिळून १०० विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील इमारती जिर्ण झाल्याने नवीन इमारती बांधून त्या ठिकाणी वर्ग सुरू करण्यात आले. पण पडक्या इमारती अद्यापही तशाच उभ्या आहे. त्या शेजारी विद्यार्थी खेळत असतात. इमारती अगदी जीर्ण झाल्या आहेत. इमारती जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असल्याने परवानगीशिवाय पं.स. किंवा स्थानिक प्रशासनाला पाडता येत नाही. हे जरी खरी असले तरी एखादी घटना घडल्यावरच इमारत पाडणार का असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. तसेच एर्खाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही पालक व गावकरी विचारत आहेत. शासन परिपत्रकाप्रमाणे पडक्या इमारती पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. पण अद्याप याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यांनी प्रस्ताव पाठविले त्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत केले. याच इमारती शेजारी बालवाड्या आहे. चिमुकले या पडक्या इमारती शेजारी खेळतात. संबंधितांनी याकडे लक्ष देत सदर इमारती पाडाव्या, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर) शासनादेशाकडे सर्वांचेच दुर्लक्ष इमारती जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असल्याने परवानगीशिवाय पंचायत समिती किंवा स्थानिक प्रशासनाला त्या पाडता येत नाही. शासन परिपत्रकाप्रमाणे पडक्या इमारती पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. पण अनेक ठिकाणी शाळा मोडकळीस येऊनही तसे प्रस्ताव जि. प. च्या शिक्षण विभागाला पाठविण्यात आलेले नाही. काही शाळांनी अश्या मोडक्या इमारती पाडण्यासंदर्भात प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविले. पण तेही धूळखात असल्याची माहिती आहे. लहान मुलांना ईजा झाल्यावरच इमारत पाडली जाणार का असा प्रश्न पालक उपस्थित करीत असून तात्काळ या इमारती पाडण्याची मागणी होत आहे.
शाळेच्या जीर्ण इमारती धोकादायक
By admin | Published: July 24, 2016 12:19 AM