लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : शहरामध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. नऊशेवर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात्र, आरोग्य विभाग तो डेंग्यू नव्हेच, अशी भूमिका घेऊन हात झटकत आहे.शहरांमध्ये ९०० च्या वर डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे सर्वत्र बोलले. शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊफुल्ल झाले असताना, तालुका आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तालुका आरोग्य प्रशासनाच्या मते तालुक्यात भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट करायला लावतात. ती चाचणीच योग्य नसल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. मागील पंधरवड्यात खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याकरिता जाणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. संपूर्ण शहरामध्ये एक हजारच्या जवळपास रुग्णसंख्या आहे. यामध्ये लहान व तरुण मुला-मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणेने याची दखल घेणे गरजेचे असताना यंत्रणा हात वर करीत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त तपासणी होत नसून, रक्त नमुना घेतला जातो. तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात वर्धा येथे अहवाल पाठविला जातो. अहवाल येण्यास तीन-चार दिवस लागतात. त्यामुळे जो रक्त नमुना अहवाल शासकीय रुग्णालयांमधून पाठविला जातो, त्यावरच आरोग्य यंत्रणा विश्वास ठेवत आहे. खासगी लॅबमधील रिपोर्टवर विश्वास ठेवायला तयार नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.
नगरपंचायतीचे उदासीन धोरण -डेंग्यूच्या थैमानाला नगरपंचायत प्रशासन जबाबदार असून, ठिकठिकाणी नाल्या बुजलेल्या आहेत. डबकीसुद्धा साचलेली आहेत. पंचायत समितीसमोरील भागात मोठ्या प्रमाणात डबकी असतात. मात्र, मोठ्या प्रमाणात कर आकारणी करणारे नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. खुल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवताचे पीक आले असून पावसाचे आणि सांडपाणी साचलेले असते. - आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहे.
नगरपंचायत प्रशासनाला धूरळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील १२ दिवसांपासून शहरामध्ये फवारणी सुरू आहे. तसेच हा विषय जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांसमोर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात केवळ ७५ रुग्ण असल्याचे सांगितले. आमदार रणजित कांबळे यांनी एवढे रुग्ण एका खेड्यात आहेत, असे सांगत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.- नितीन दर्यापूरकर, उपाध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा.
सर्व बाबींना नगरपंचायत प्रशासन जबाबदार असून, कुठेही फवारणी करण्यात आली नाही. स्वच्छता होत नाही. त्यामुळेही डेंग्यूने डोके वर काढले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने शहरामध्ये डेंग्यू तपासणी करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून जनतेला अधिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही.- शिरीष भांगे, माजी सरपंच, कारंजा (घा.)
कारंजा शहरामध्ये कोणतीही भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी लॅबमध्ये एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट केली जाते. ती पूर्णपणे विश्वासार्ह नसते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. -डॉ. सुरेश रंगारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, कारंजा (घा.)