मांत्रिकाला केली होती मारहाण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार समुद्रपूर : जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील जाम चौरस्ता येथे मंगळवारी (दि.१२) १५ ते २० व्यक्तींनी एका मंत्रिकाला जबर मारहाण केली होती. यामुळे संपूर्ण गावच जादूटोणा प्रकरणाच्या दहशतीत होते. प्रकरणातील दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांकविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत नागरिकांचे प्रबोधन केले. यामुळे जाम येथील जादूटोणा प्रकरणावर पडदा पडला असून नागरिकांची भीतीही दूर झाली आहे.अ.भा. अंनिसच्या समुद्रपूर येथील कार्यकर्त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही कुटुंबीयांची भेट घेत समजून काढली. गावात जाहीर सभा घेत मांत्रिकाला अंगात दैवी शक्ती नसल्याचा कबुली जबाब द्यायला लावला. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जाम चौरस्ता गाव संवेदनशील समजले जाते. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता किसना ढेपे यांनी १५ ते २० युवकांना घेऊन घराजवळील मांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भास्कर राऊत याला मुलीवर जादूटोणा करतो म्हणून मारहाण केली. भास्कर राऊतने किसना ढेपेविरूद्ध पोलीस ठाण्यात जादूटोणा करण्याचा आरोप करून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. ढेपे यांच्या मुलीला राऊत शिवीगाळ करीत असल्याची तक्रार दिली. मारहाणीमुळे भास्कर दहशतीत होता. त्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणात मदतीची मागणी केली. समितीचे तालुका संघटक प्रफूल्ल कुडे, सचिव श्याम डेकाटे, कृष्णा धुळे, प्रीतम रंगारी, गौरव इसपाडे, अमोल डोंगरे, मंगेश थूल, पलाश लाजूरकर आदी कार्यकर्त्यांनी जाम गाठून किसना ढेपे व भास्कर राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना जादुटोणाविरोधी कायद्याची माहिती दिली. यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी ताकीद दिली. बुधवारी जिल्हा संघटक पंकज वंजारे, आकाश जयस्वाल, उमेश पोटे, शंकर बावणे, प्रफूल्ल कुडे, शुभम जळगावकर यांनी दोन्ही कुटुंबातील समस्यांशी संवाद साधला. मारहाणीचा प्रकार होणार नाही, अशी कबुली ढेपे कुटुंबीयांकडून लिहून घेतली तर मांत्रिक भास्कर राऊत याच्याकडूनही अंगात दैवीशक्ती नसल्याचा व यानंतर असा प्रकार न करण्याची कबुली लिहून घेतली. एवढेच नव्हे तर सायंकाळी जि.प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वंजारे यांनी जाहीर सभा घेत राऊत याला अंगात दैवीशक्ती नसल्याची कबुली द्यायला लावली. यावेळी ठाणेदार रणजीतसिंह चव्हाण, सरपंच रिना जांगळेकर, राहुल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी पंकज वंजारे यांनी जादूटोणा कायद्याविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. अनिल खुडसंगे, शुभम वाढई, गंगशेट्टीवार, गजानन तळवेकर, भारत बैलमारे, उपसरंच सचिन गावंडे, संजीत ढोके, वृषभ राजूरकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
जाम येथील जादूटोणा प्रकारावर अखेर पडदा
By admin | Published: January 18, 2016 2:18 AM