वर्धेतील दुसऱ्या सभेने दिली काँग्रेस कार्यकर्त्यांना उर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:40 AM2018-10-03T00:40:27+5:302018-10-03T00:41:27+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती. त्यावेळच्या तूलनेत यंदाच्या जाहीर सभेला खा. राहुल गांधी यांच्यासह दिग्गजांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यंदा राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गजांनी सर्कस मैदान येथील व्यासपीठावरून केलेले मार्गदर्शन काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना नवी उर्जा देणारेच ठरले आहे. रात्री उशीरापर्यंत ठिकठिकाणी राहुल गांधींच्या भाषणाची चर्चा होत होती.
पदाधिकाऱ्यांनी आॅटोरिक्षातून धरला रस्ता
काँग्रेसच्या पदयात्रेदरम्यान एकच गर्दी झाल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. यादरम्यान काही नेत्यांनी सभास्थळापर्यंत पोहचण्यासाठी आॅटोरिक्षा आधार घेतल्याचे याची देही याची डोळा नागरिकांनी बघितले. तर काहींनी परतीचा प्रवास सायकलरिक्षाने केला.
शहरातील गल्लीबोळात वाहनतळ
राज्यभरातून कार्यकर्त्यांचे वाहने मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते; पण ही वाहने मिळेल त्या गल्ली-बोळात उभी केल्याने अनेक रस्त्यांना वाहनतळाचे स्वरुप आले होते. रामनगरात जाहीर सभा असल्याने या परिसरातील गल्ल्या व रस्ते वाहनामुळे गजबजून गेले होते. बॅचलर रोडवरही वाहनांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राहिल्याने सायंकाळी उशिरापर्यंत या मार्गावर वाहतुकीची कोडी कायम होती.
नेते पुढे-पुढे कार्यकर्ते मागे-मागे
खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापासून निघणार असल्याची माहिती देण्यात आल्याने राज्यभरातून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी तेथे दाखल झाले होते; पण वेळेचा विचार करुन ही पदयात्रा इतवारा परिसरातून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. खा.गांधी हे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरूवातीला वाहनात बसून पुढे गेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन पदयात्रेत सहभागी होत सर्कस मैदानापर्यंत पायी आले. परंतू सर्वच नेते वाहनातून पुढे निघून गेल्याने कार्यकर्ते मात्र धावपळ करीत त्यांच्या मागे निघाले. काहींनी इतवारापरिसर गाठला तर काहींनी मिळेल तो मार्ग पकडून सर्कस मैदानाचा मार्ग धरला. यात बहूतांश कार्यकर्त्यांना सभेचे ठिकाणच माहिती नसल्याने शहरातच घिरट्या घालत राहीले.