लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या १७ कोविड केअर सेंटर कार्यरत असून त्या ठिकाणी तब्बल एक हजार आठ रुग्ण खाटांची व्यवस्था आहे. परंतु, सध्या कोविडच्या दुसरी लाट निच्चांकीवर स्थिरावल्याने सध्यास्थितीत कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ३६ ॲक्टिव्ह कोविड बाधित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भीती संचारल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच सुरुवातील आठ असलेल्या कोविड केअर सेंटरची संख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तब्बल १७ करण्यात आली. शिवाय बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. सध्यास्थितीत १७ कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे ३० डॉक्टर, ६० परिचारिका ७० वॉर्डबॉय सेवा देत आहेत. परंतु, नवीन कोविड बाधित सापडण्याची संख्या रोडावल्याने तसेच कोविड केअर सेंटरमध्ये मोजकेच ॲक्टिव्ह कोविड बाधित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरी जाण्याच्या भीतीने घर केले आहे. सध्यास्थितीत एकही कोविड केअर सेंटर बंद करण्यासह कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला कमी करण्यात आले नसले तरी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने आरोग्य सेवेत कायम करावे, अशी मागणी आहे.
सीसीसीमध्ये मिळते गुणवत्तापूर्ण भोजन- जिल्ह्यात एकूण १७ कोविड केअर सेंटर असून तेथे उत्तम गुणवत्तेचे जेवण ॲक्टिव्ह कोविड बाधितांना दिले जाते.- ज्या ॲक्टिव्ह कोविड बाधिताच्या घरी अलगीकरणासाठी वेगळी व्यवस्था नाही अशांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. - कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या प्रत्येक ॲक्टिव्ह कोविड बाधिताची दररोज आरोग्य तपासणी केली जाते.- प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच कोविड बाधिताला तातडीने कोविड केअर सेंटरमधून कोविड रुग्णालयात दाखल केले जाते.
प्रत्येक कर्मचाऱ्याला विमा कवच- शासनाच्या नियमानुसार कोविड केअर सेंटरमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला विम्याचे कवच देण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण १७ कोविड केअर सेंटर असून तेथे दाखल प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. या ठिकाणी दररोज रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते. कोविड केअर सेंटरमध्येच चांगल्या गुणवत्तेचे जेवण रुग्णांना दिले जाते. - डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला नियमित वेतन मिळाले पाहिजे. शिवाय शासनाने आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित केले पाहिजे, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले