वर्धा : खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त ५३० तक्रारीपैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष असल्याचे आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ११७ शेतकºयांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून ४ लाख ८५ हजार ७५० रुपये नुकसान भरपाई म्हणून कंपनीने अदा केल्याची माहिती जि.प. कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या ५३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने प्राप्त तक्रारीची तपासणी करुन पंचनामे केले. त्यापैकी एकूण ३२९ तक्रारींमध्ये तालुकास्तरीय समीतीच्या तपासणीत बियाणे सदोष आढळुन आले. त्याअनुषंगाने बियाणे सदोष असल्यामुळे ईगल सिड्स प्रा. लि. इंदोर या कंपनीवर हिंगणघाट कृषी अधिकारी यांनी ३ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. शिवाय फौजदारी कार्यवाही सध्या सुरु आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गुणनियंत्रण निरिक्षकामार्फत खरीप हंगामामध्ये आतापर्यंत बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व किटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळेस आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषगाने बियाणे ४७, रासायनिक खते १७, व किटकनाशक ६ अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आला. तसेच शासनामार्फत जि.प. कृषी विभागाला अप्रमाणित बियाणे २७०, कीटकनाशके ४९ व रासायनिक खतांचे १९२ नमुने घेण्याचा लक्षांक देण्यात आला होता. त्याअनुषंगाने आतापर्यंत बियाणे-१६९, रासायनिक खते-१२२ व किटकनाशक १८ नमुने घेवुन विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे.
विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये बियाणे-१० नमुने, रासायनिक खते-७ नमुने अप्रमाणीत घोषित झाले. याबाबत ६ कंपनी व ६ कृषी केंद्रांवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच पंचायत समिती सेलु अंतर्गत केळझर येथे बोगस बिटी बियाणे सापडल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी संबधीतावर २० जूनला गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभाग व जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने बोगस खत, बियाणे सापडल्याने संयुक्त कार्यवाही करुन २१ जूनला संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे.