न्यायालयाचे आदेश : पुरावे गहाळ होण्याचा संशयवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कार्यालयातील दस्तऐवज लंपास होण्याची शक्यता असल्याच्या कारणाने वर्धेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारपर्यंत सील ठोकावे असे आदेश, जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने सायंकाळी सील ठोकण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. तत्पूर्वी अटक असलेल्या तिनही आरोपींकडून त्यांच्या कार्यालयात असलेल्या या कामांची कागदपत्रे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. अटक असलेल्या सुनील सुटे, स्वप्निल शेळके व उल्हास नाडे या तिघांना लाच स्वीकारताना बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामुळे या तिघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. लाचलुचपत विभागाच्यावतीने या आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांनी रवानगी न्यायालयीन कोठडीत करीत जामिनावर सुटका केली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असल्याने त्याच्यावतीने कार्यालयातील कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता लाचलुचपत प्रबिधंक विभागाकडून वर्तविण्यात आली. याची दखल घेत न्यायाधीयश अनिरुद्ध चांदेकर यांनी तालुका कृषी कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश दिले. सध्या चार जणांच्या असलेल्या या श्रृंखलेत आणखी आरोपी आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी ज्या कामांची देयके मंजूर केली त्या कामांशी संबंधीत कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरू होती. या कागदत्रातून अटकेत असलेल्या आरोपींकडून जलशिवार योजनेत झालेल्या कामांत किती रुपयांचा घोळ झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न असून यात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात असलेल्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कामांना मंजुरी देत देयके आदा केली आहेत; याच्या हिशेबाचीही तपासणी होणार आहे. यात जर त्यांनी ३० टक्क्यांच्या हिशेबाने कमीशन घेतले असेल तर त्यांच्या खात्यात किती रक्कम गेली याचाही तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
वर्धेचे तालुका कृषी कार्यालय केले सील
By admin | Published: August 27, 2016 12:20 AM