वर्धा: प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बोरगाव मेघे येथील सिद्धार्थनगर परिसरात छापा मारुन आरोपीस सुगंधीत तंबाखूची विक्री करताना रंगेहात पकडले. खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार इलेक्ट्रीक मशीन्स, मोबाईल असा एकूण १ लाख १ हजार १६६ रुपयांचा तंबाखूसाठा जप्त करीत आरोपीस बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून १३ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. अमीर खान हमीद खान पठाण (३४ रा. सिद्धार्थनगर बोरगाव मेघे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शंकर किराणा स्टोअर्सचा मालक शंकर सेठ रा. पांढूर्णा मध्यप्रदेश हा पसार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी अमीर खान हमीद खान पठाण हा त्याच्या राहत्या घरी प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखू बाळून त्याचा तंबाखू मिश्रीत खर्रा तयार करुन विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा मारुन घर तपासणीत सुगंधित तंबाखूसाठा आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल व तंबाखूसाठा असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करीत बेड्या ठोकल्या.
तंबाखूसाठा हा पांढूर्णा येथील रहिवासी शंकर सेठ याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, चंद्रकांत बुरंगे, अरविंद येणुरकर, मनीष कांबळे, भूषण निघोट,महादेव सानप, शिवकुमार परदेशी, गजानन दरणे तसेच अन्न व सुरक्षा विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी किरण गेडाम, यादव यांनी केली.