लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या सेलू मार्केटच्या कापूस लिलावाला शुभारंभ युवा नेते समिर देशमुख यांच्या हस्ते सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती काशीनाथ लोणकर, सदस्य बबनराव हिंगणेकर, केशरीचंद खंगारे, युसुफ शेख, राजेश जायस्वाल, गुणवंत कडू, अनिल जिकार, संदीप वाणी, दिलीप ठाकरे, शीला धोटे, निलिमा दंडारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. आधारभूत किमतीने कापूस खरेदीला अजून वेळ असल्याने व ऐन दिवाळी आणी रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पैशाची चणचण असल्याने समिती व्यवस्थापनाकडे खुल्या लिलावाचे आयोजन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. यावेळी कापूस व्यापारी साईनाथ जुवाडी, एस.आर.काॅटन सेलू, साई गोल्ड सेलू, गोल्ड फायबर सेलू, संस्कार उद्योग सेलू, गिरीराज काॅटेक्स सेलू हजर होते. शेतकऱ्यांनी कापूस वाहनांद्वारे आणलेला होता. सभापतींनी उपस्थिती शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ व दुपट्टा देऊन सत्कार केला. कापूस मार्केटच्या आवश्यक सूचना समजावून दिल्या. लिलावामध्ये कापसाला सर्वाधिक भाव ८ हजार १६६ देण्यात आला. लिलावामध्ये कापसाला उच्च भाव मिळत असल्याने व २४ तासांत कापसाचे चुकारे मिळणार असल्याने कापूस लिलावात विक्री करण्याबाबत आवाहन सभापती वानखेडे यांनी केले. मागील वर्षी सेलू शाखेत ४००००० लाख क्विंटल कापसाची विक्रमी आवक आली होती. पारदर्शक व्यवहार व शेतकऱ्यांचा प्रश्नांचे,शंकाचे त्वरित समाधान करण्यास व अडचणी दूर करण्यास समिती तत्पर आहे. सी.सी.आयची कापूस खरेदी दिवाळीनंतर खुल्या बाजारात सुरू होण्याची शक्यता सभापतींनी व्यक्त केली. सदर उद्घाटन प्रसंगी समितीचे सचिव सुफी, उपशाखा प्रमुख भांडारकर, कापूस विभाग प्रमुख पडवे उपस्थित होते. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
देवळीत बाजारपेठ फुलली, दररोज ५ हजार क्विंटलची आवक
- देवळी : देवळी व परिसरातील शेतशिवारात चांगले स्टेपल असलेला कापूस पिकत असल्याने या कासाला खुल्या बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे येथील कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सध्या देवळीची बाजारपेठ फुलली असून दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक येत आहे.या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ५१ ते ८ हजार ४५५ रुपये भाव मिळत असून येत्या काही दिवसांत हे भाव प्रति क्विंटल ९ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त काढल्यानंतर गेल्या आठवडाभरात देवळी केंद्रावर ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुलगाव बाजारात ८ हजार क्विंटल तसेच शिरपूर येथे ३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यावेळेस कापसाला व्यवस्थित भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. यातच संपूर्ण शेत कापसाने पांढरे झाले असताना मजुरांअभावी त्याची दाणादाण पाहिली जात आहे. एकदाचा कापूस घरी आणून मार्केटमध्ये न्यावा यासाठी त्याची लगबग पाहिली जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांना यानंतरही भाववाढीची अपेक्षा असल्याने आपला कापूस साठवून ठेवला आहे.