डिझेलची होतेय नासाडी : आगाराने दक्षता घेण्याची मागणी देवळी : महामंडळ रात्री मुक्कामी राहणाऱ्या बसफेरीवर अनेकदा महिला वाहक पाठवित असतात. मात्र महिला वाहकांची गावखेड्यात राहण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने मुक्कामी आलेली बस रात्रीच त्या दिवशी परत जाते. दुसऱ्या दिवशी ही बस सकाळी उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच महामंडळालासुद्धा इंधनाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुक्कामी राहणाऱ्या बसफेरींवर पुरूष वाहक पाठविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.नजीकच्या गौळ येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता देवळी येथे येतात. गोरगरीब घरचे विद्यार्थी असल्याने त्यांना बसशिवाय दुसरा पर्याय नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाद्वारे गावात रात्री मुक्कामी राहणारी बसफेरी सुरू करण्यात आली. परंतु या बसफेरीवर महिला वाहकाला पाठविले जाते. परिणामी ही बस मुक्कामी न राहता देवळी येथे परत जाते. याबाबत विचारणा केली असता महिला वाहकांची खेड्यात मुक्कमी राहण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तसेच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. ज्या आगारामध्ये महिला बसवाहक कार्यरत आहेत. त्यांना सायंकाळी सात वाजतापर्यंत संपणाऱ्या बसफेऱ्यावरच पाठविण्यात यावे, असे निर्देश असताना पुलगाव आगार रात्री साडेआठ वाजतापर्यंत धावणाऱ्या बसफेऱ्यांवर महिला वाहकांना पाठवितात. गौळ येथे संध्याकाळी मुक्कामी येणारी बस साडेसात वाजता देवळी बसस्थानकावरून सुटते. देवळी ते गौळ १८ किलोमीटरचे अंतर असून ही बस रात्री आठ वाजता गौळला पोहोचते. या बसफेरीवर महिला वाहक असल्यास ही बस पुन्हा देवळीला परत जाते. दुसऱ्या दिवशी ही बस १८ किलोमीटर अंतर प्रवाशाविना कापत सकाळी गौळला येथे येते. त्यामुळे ३६ किलोमीटर ही बस विनाकारण फिरते. यात महामंडळाचे अतिरिक्त डिझेल खर्च होत आहे. याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. रात्री मुक्कामी असलेली नियमित बस ५.४५ मिनिटांनी सुटण्याऐवजी महिला वाहक ज्यादिवशी असेल त्या दिवशी सहा वाजता सुटते. विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.(प्रतिनिधी)
मुक्कामी राहणाऱ्या बसेसवर पुरूष वाहक पाठवावा
By admin | Published: January 17, 2016 2:03 AM