लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच वर्धा शहराचे तापमानही वाढतीवरच आहे. त्यामुळे या दोन्ही समस्यांनी त्रस्त झालेल्या साठीपलीकडील ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे. वर्धा शहरातून ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक सध्या पुणे व मुंबईत दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात वर्धा जिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा जलाशय कोरडे झाले आहेत. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पातही आता केवळ मृत पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मागील दोन महिन्यांपासून वर्धा शहराला ६ ते ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक भागातील विहिरी, बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. काही भागात खासगी टँकर बोलावून पाणीपुरवठा केला जातो. या पाणी समस्येला तोंड देताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकजण पाण्याच्या समस्येमुळे तणावात असून त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. पाणी आणायचे कोठून, हा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. बहुतांश ज्येष्ठ नागरिक पेन्शनरधारक आहेत. एक ते दोन सदस्यांचे कुटुंब त्यातही पाणी व उष्णतामानाचे संकट अशा परिस्थितीत कूलर चालविणेही कठीण झाल्याने त्यांनी वर्धा शहर सोडण्याचा निर्णय घेऊन आपल्या मुलांमुलींकडे पुणे शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मागील दोन ते अडीच महिन्यांपासून घरांना कुलूप लावून पुण्या-मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते दररोज वर्धा शहराच्या पाणी समस्येची माहिती जवळच्या नातलगांकडून घेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आमचे तिकडे येणे होईल, असा निरोपही काहींनी आपल्या नातलगांना दिला आहे. वर्धा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी समस्या उद्भवली आहे.
इच्छा नसताना पुण्यात वास्तव्यसंपूर्ण नोकरीचा, शेतीचा काळ वर्धा जिल्ह्यात, शहरात गेला. आता या भागात मोठा गोतावळा निर्माण झाला. तो सोडून केवळ पाणी समस्येमुळे वर्धा शहर सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा नसताना आई-बाबांना त्रास होऊन नये म्हणून मुला मुलींनी आपल्या आईवडिलांना तेथे बोलावून घेतले आहे.मुलगा पुण्यामध्ये खासगी कंपनीत नोकरीवर आहे. वर्धा शहरात पाणीटंचाईचे सावट गडद झाल्याने मोठे पाणी मिळविण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यावर मात करणे आम्हाला शक्य होत नव्हते. त्यामुळे मुलाने तुम्ही तातडीने निघून या, अशी सूचना केली. आता पुण्याला त्याच्याकडे आहोत.अरविंद वैद्य, रहिवासी, वर्धा.