वर्धा : सेवापुस्तिकेतील त्रुट्या दुरुस्त करीत बेसिक पगारामध्ये फरक काढून बिल मंजुरीकरिता पाठविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ लिपिकाने २० हजारांची मागणी केली होती. यातील दहा हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ लिपिकास राहत्या घरून अटक करण्यात आली.
जुगलकिशोर अलकानारायण बाजपेयी (५१) रा. एकवीरा अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक एस-१०२ दुसरा माळा शांतीनगर रोड, सिंदी (मेघे) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. तो वर्ध्यातील जलसंपदा विभागात कार्यरत असून त्याने पाटबंधारे विभागातून मजूर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीस सेवापुस्तिकेतील त्रुट्या दुरुस्त करीत बेसिक पगारामध्ये फरक काढून बिल मंजुरीकरिता पाठविण्यासाठी २० हजारांची लाच मागितली होती. दहा हजार रुपये आता तर दहा हजार रुपये चेकचे पैसे मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांस पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी वर्ध्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठरल्यानुसार जुगलकिशोर बाजपेयी याच्या घरी सकाळी दहा हजारांची लाच स्वीकारत असताना अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, वाचक पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात रवींद्र बावनेर, संतोष बावनकुळे, विनोद धोंगडे, प्रदीप कुचनकर, प्रशांत मानमोडे, स्मिता भगत यांनी केली.