हात पाय तोडून मृतदेह फेकल्याचा संशय समुद्रपूर: तालुक्यातील सेवा-तांबारी शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजला असून त्याचे हात पाय तोडून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने येथे फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. सकाळी सेवा शिवारातील कालवा परिसरात एक कुजलेला मृतदेह पडून असल्याची माहिती गावातील काही युवकाच्या कानावर आली. नागरिकांनी या परिसरात धाव घेतली असता परिसरात दुर्गंधी येवू लागली. या युवकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण मुंडे सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता सदर मृतदेह वामन खोडके यांच्या पडिक शेतामध्ये पडून होता. मृतदेहाचे हात व पाय तोडून असल्याचे प्रथमदर्शी लक्षात आले. सुमारे आठ दिवसांपूर्वी हा मृतदेह येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा असा संशयही पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सदर इसमाबाबत तांबारी परिसरातील व्यक्ती कुणीही सांगायला तयार नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश वांदिले यांना पाचारण करण्यात आले. येथेच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. शिवाय गत आठ ते दहा दिवसांपासून कुणी बेपत्ता असल्याची कुठलीही तक्रार समुद्रपूर ठाण्यात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक उमेश हरणखेडे, बुरंगे, चंद्रशेखर रोहनकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगत यांच्यासह कर्मचारी करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी) घटनास्थळीच शवविच्छेदन मृतदेह कुजलेला असल्याने पंचनामा करून त्याचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शैलेश वांदिले यांना पाचारण करण्यात आले होते. हाताचे व पायाचे पंजे गायब कालवा परिसरात आढहून आलेल्या मृतदेहाच्या हाताचे आणि पायाचे पंजे नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्याची हत्या करून मृतदेह येथे फेकला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संशयास्पद मृतदेहामुळे परिसरात खळबळ
By admin | Published: February 04, 2017 12:17 AM