लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गौळ येथील उपसरपंच मनोज नागपुरे व माजी खविस संचालक खटेश्वर खोडके या दोन कास्तकारांनी स्वातंत्रदिनी खविस कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने खळबळ उडाली. यावेळी झालेल्या ओढाताणीत तोंडात पेट्रोल गेल्याने आंदोलनकर्त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नाफेडच्या चणा खरेदी दरम्यानच्या प्रक्रियेत दोषी असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचे निलंबन तसेच खविस ग्रेडरवरील कारवाईसाठी त्यांनी प्रशासनाला १५ आॅगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचे अल्टीमेटम दिले होते. सकाळी अचानक खविस कार्यालयासामोर येऊन अंगावर पेट्रोल घेतल्याने उपस्थित पोलिसांची धांदल उडाली.
नाफेडच्या चणा खरेदी दरम्यान गौळ येथील कास्तकाराकडून जास्तीचे पैसे उकळून गैरव्यवहार करणाऱ्या खविस ग्रेडरवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची तक्रार तसेच पुरावे देऊन सुद्धा संबंधितावर गुन्हा दाखल न करणा?्या पोलीस उपनिरीक्षक मल्हारी टाळीकोटे यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गौळ येथील राहुल सारजे, मनोज नागपुरे व खटेश्वर खोडके या कास्तकारांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यादरम्यान तोडगा काढण्यासाठी तहसीलदार राजेश सरवदे यांनी १४ ऑगस्ट रोजी एका बैठकीचे आयोजन करून यामध्ये संबंधित अधिकारी, पदाधिकारी व आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या कास्तकारांना बोलाविले होते. बैठकीला पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, खविस अध्यक्ष अमोल कसणारे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संजय कामनापुरे तसेच सहायक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परंतु या बैठकीला तिन्ही कास्तकार न आल्याने तहसीलदार सरवदे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश काढले होते. दरम्यान स्वातंत्र्यदिनाचे आदले रात्री कास्तकार सारजे याला अटक करण्यात आली. उर्वरित दोघे न मिळाल्याने खविस कार्यालयासामोर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे वादग्रस्त चणा प्रकरणातील खविस अध्यक्ष कसणारे व आत्मदहनाचा इशारा देणारे कास्तकार एकाच गावाचे असल्याने आरोप- प्रत्यारोप तसेच चर्चेला तोंड फुटले आहे