वर्धा : नागपूर कराराप्रमाणे विदर्भाच्या हक्काचे सिंचनाचे ६० हजार कोटी रुपये कमी मिळाले, असून सिंचनाचा अनुशेष कायम आहे. निधीअभावी विदर्भातील १३१ धरणे अपूर्ण असल्याने १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. विदर्भात २.५७ लाख रिक्त पदे असून, १४ लाख बेरोजगार आहेत. विदर्भाचा सिंचनाचा व इतर क्षेत्रातील एकूण ७५ हजार कोटींचा अनुशेष भरून निघणे शक्य नसल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे, प्रतिपादन माजी आ. ॲड. वामन चटप यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारा संचालित अग्निहोत्री महाविद्यालयात बुधवारी शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात ‘विदर्भाला स्वातंत्र्य का हवे, विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. अतिथी म्हणून माजी आ. वामन चटप, प्रभाकर कोंडबतकुलवार, सतीश दाणी उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर कोंडबतकुलवार यांनी नागपूरला १९२० मध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यात भाषावार प्रांतरचनेचा ठराव संमत केला होता. त्याकाळी मराठी भाषिक समाज मुंबई प्रांत, हैदराबाद संस्थान व मध्य प्रांत व वऱ्हाड या तीन ठिकाणी विभागलेला होता. या तीनपैकी दोन ठिकाणी म्हणजे मुंबई प्रांत व मध्य प्रांत व वऱ्हाड येथे इंग्रजांची थेट सत्ता होती व हैदराबाद संस्थान निजामांच्या ताब्यात होते. भूगोलाचा विचार केल्यास या तीन तुकड्यांना एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणे शक्य होते. यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मागणीला पाठिंबा मिळत होता. नागपूरनिवासी साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून या मागणीला पाठिंबा दिला होता. केंद्र सरकारने १९५५ साली न्यायमूर्ती फाझल अली यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या ‘राज्य पुनर्रचना आयोगा’नेसुद्धा स्वतंत्र विदर्भ असावा, अशी शिफारस केली होती असे ते म्हणाले.
यावेळी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. सतीश दाणी यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची महती विशद केली. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. जंगमवार यांनी केले तर आभार डॉ. कोठारे यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ. धर्मेंद्र मुंदडा, डॉ. महल्ले, डॉ. ताकसांडे, प्रा. बडगायिया, डॉ. जुमळे आदींची उपस्थिती होती.