लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटाने सर्वांनाच कवेत घेतले आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवासमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यात ११ रुग्ण विलगीकरणात होते. दोघांना सुटी झाल्याने सध्या ९ रुग्ण आहेत.
दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विलगीकरणाची समस्या निर्माण झालेली आहे. दवाखान्यातही तपासणीसाठी येणारे हे ताप, सर्दी खोकला आदी आजारांचे रुग्ण असल्याचे विशेष बाह्य रुग्ण तपासणी विभागात लागलेल्या लांब रांगांवरून दिसून येते. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. मात्र, आता या आजाराने सामान्य लोकांनाही कवेत घेतल्याने अनेकांना घरी राहण्याची समस्या भेडसावत आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने यात्री निवास अधिग्रहीत करून स्वत: खर्च करू शकणाऱ्यांसाठी गृह विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रुग्णालयाकडून संबंधित रुग्णांना तशा प्रकारचे पत्र देऊन यात्री निवासमध्ये निवास व भोजनाची सुविधा प्रदान करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पारित केलेला आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पांडे, परिचारिका नूतन हाडके तसेच नोडल अधिकारी नीलेश वाडेकर, नियत्रंण अधिकारी गिरीश काळे पूर्ण वेळ कर्तव्यावर असून, त्यांना यात्री निवासचे मिथुन हरडे, रामेश्वर गाखरे, संदीप शेंडे, रूपचंद फुलमाळी, पंढरी थूल, सुधीर मडावी सहकार्य करीत आहेत.
यात्री निवासमध्ये १६८ बेड उपलब्ध आहेत. १९ एप्रिलपासून केंद्र सुरू करण्यात आले आहे. चोवीस तास संबधित सेवा उपलब्ध असल्याने रुग्णही समाधानी आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कर्तव्य करीत आहोत.
- गिरीश काळे, नियत्रंण अधिकारी, गृहविलगीकरण केंद्र, सेवाग्राम.