वर्धा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये अंतर्भूत केल्याप्रमाणे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील शालेय कामकाजाच्या दिवसांचे निर्धारण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. वर्धा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षण कायद्यापूर्वी महाराष्ट्रात प्रचलित नियमानुसार तथा मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९ च्या कलम १२५ नुसार दरवर्षी किमान २३० दिवस प्राथमिक शाळांचे कामकाजाचे दिवस निर्धारित केले जायचे. भारताच्या संसदेने ८६ वी घटना दुरूस्ती करून सहा ते १४ वर्षे वयोगटाच्या बालकांसाठी (वर्ग १ ते ८) मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९ मंजूर केला व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून अधिसुचनेद्वारे सुरू झाली आहे.शिक्षण कायद्याच्या कलम १९, परिशिष्ट - १ मधील अनुक्रमांक - ३ नुसार पहिली ते पाचवीकरिता शैक्षणिक वर्षातील शालेय कामकाजाचे २०० दिवस आणि सहावी ते आठवी वर्गाकरिता २२० दिवस ठरविण्यात आले आहे. या प्रमाणेच गत सत्रात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे कामकाजाचे दिवस २२२ नक्की करण्यात आले होते. या वर्षी २०१४-१५ मध्ये मात्र कायद्याला बगल देऊन शाळेचे दिवस २३७ करण्यात आले. या सुट्या व शाळांच्या दिवस निर्धारणाच्या शिक्षण विभाग जि. प. कार्यालयाच्या समन्वय सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आक्षेप घेत सभा त्याग केला होता. शालेय कामकाजाचे वर्षातील २३७ दिवस निश्चित करणे हे शिक्षण कायद्याला घरून नाही व विसंगत आहे. त्यामुळे ही शाळा २२० एवढेच दिवस असावी अशी आग्रही भूमिका घेतली. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे व कोषाध्यक्ष तथा जि. प. शिक्षण समितीचे निमंत्रीत सदस्य वसंत बोडखे यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. वर्धा यांना दिले आहे.(प्रतिनिधी)
शिक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कामकाजाचे दिवस निश्चित करा
By admin | Published: October 12, 2014 11:48 PM