लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. परंतु, इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीक विम्याची ही पद्धत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.वर्धा जिल्ह्यातील ५०१ बिगर कर्जदार तर ३४ हजार ५५८ कर्जदार शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विम्याचे कवच घेतले होते. विशेष म्हणजे पीक कर्ज घेणाऱ्यां प्रत्येक शेतकऱ्याला विमा काढणे आवश्यक करण्यात आले होते. मागील वर्षी सदर शेतकºयांची ६.७५ कोटी तर राज्य शासनाचा ६.२९ कोटी व केंद्र सरकारचा ६.२९ कोटींचा निधी या विमा कंपनीकडे वळता झाला.परंतु, सरते शेवटी केवळ ७७९ शेतकऱ्यांना विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरवित त्यांना नाममात्र ४१.१४ लाख रुपये देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या नावाखाली या विमा कंपनीने शेतकऱ्यांसह केंद्र व राज्य शासनाची फसवणूक केली आहे. शिवाय स्वत:ला लाभ पोहोचून घेतला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्विकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रविण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 9:37 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ ...
ठळक मुद्देपीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी