लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : दुर्गम भागातील ग्रामस्थ गावात घडलेल्या लहान-मोठ्या गुन्ह्यांची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे आता पोलीस ठाण्याचे कर्मचारीच दुर्गम भागातील गावांत जाणार आहेत. या ठिकाणी लहान-सहान तक्रारी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा उपक्रम तळेगाव पोलिसांनी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सुरू केला आहे.या फिरत्या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गावांतील तक्रारींवर तेथेच समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गंभीर व मोठ्या गुन्ह्यांची फिर्याद पोलीस ठाण्यात बोलवून नोंदवून घेण्यात येणार आहे. तळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खडका, परतोडा या गावात फिरते पोलीस ठाणे २७ एप्रिल रोजी दाखल झाले होते. यावेळी पोलीस गाडीला ‘फिरते पोलीस स्टेशन’ असे बॅनर लावून तेथील कुणाच्या काही तक्रारी असतील तर त्या तेथेच नोंदविता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यात तळेगाव ठाण्यांतर्गत दुर्गम भागात जाऊन नागरिकांना माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांनी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक गावांत जाऊन लोकांच्या तक्रारी असतील, त्या सामोपचाराने निपटणाऱ्या असतील तर तेथेच निकाली काढल्या जातील. प्रकरण गुन्हा दाखल करण्याजोगे असेल तर संबंधित व्यक्तीची फिर्याद, बयान नोंदवून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल, असे सांगितले. २७ एप्रिलला परतोडा येथील पथकात पोलीस हवालदार राजेंद्र कापसे, नामदेव नंदनवार, आशिष नेवारे, देवेंद्र गुजर आदींनी सहभाग घेतला.
फिरत्या पोलीस ठाण्याद्वारे होणार तक्रारींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:29 PM
दुर्गम भागातील ग्रामस्थ गावात घडलेल्या लहान-मोठ्या गुन्ह्यांची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे आता पोलीस ठाण्याचे कर्मचारीच दुर्गम भागातील गावांत जाणार आहेत.
ठळक मुद्देतळेगाव (श्या.पंत) पोलिसांचा उपक्रम