लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५०वे जयंती वर्ष व त्यांच्या जिल्ह्यातील आगमनास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाने वर्धाचे सेवाग्राम व पवनारचा विकास करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. या तीनही स्थळांच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मूल्याचे दर्शन घडविणारे आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा आढावा घेऊन मार्चपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश माथुरकर, विद्युत वितरणचे उपअभियंता ईशान कुलकर्णी, मेडाचे जिल्हा व्यवस्थापक अभिनव कुळकर्णी, आराखड्याचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार निरा अडारकर, अरुण काळे, रजनीश गोरे, वसीम खान आदी उपस्थित होते. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा, सेवाग्राम व पवनार येथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परिसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळ्यांचा समावेश आहे. सेवाग्राम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षक यात्री निवास उभारण्यात आले आहे. तीनही ठिकाणी रस्ते व चौकांचे सौंदर्यीकरण, धाम नदीवर सुशोभीकरण तसेच ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प उभारण्यात आले आहे. ठिकठिकाणी भिंतीवर गांधीजींच्या कार्याची महती सांगणारे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा कामनिहाय आढावा घेतला. सध्या अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभाग व काम करणाऱ्या संस्थांना दिले. वर्धा, सेवाग्राम हे जागतिक कीर्तीचे स्थळ असून, पर्यटकांसाठी आराखड्यातून विविध प्रकारांच्या सुविधाही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी भविष्यात पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.