वर्धा : वर्धेकडून हिंगणघाटच्या दिशेने भरधाव जात असलेली कार दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित होऊन उलटली. यात दुचाकीचालकासह एकूण सात व्यक्ती जखमी झाले. हा अपघात वेळा शिवारात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.
खमींना उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे जखमींमध्ये हिंगणघाट येथील काही न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून यातील दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ ए.एच. ९५४३ क्रमांकाच्या कारने हिंगणघाट येथील न्यायालयातील काही कर्मचारी वर्धा येथून हिंगणघाटच्या दिशेने येत होते. भरधाव कार हिंगणघाट-वर्धा मार्गावरील वेळा शिवारात आली असता भरधाव असलेल्या दुचाकी चालकास वाचविण्याचा प्रयत्न कारचालकाने केला. अशातच कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार उलटली. या घटनेत कारमधील सहा तर दुचाकीचालक असे एकूण सात व्यक्ती जखमी झालेत.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले. माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस ठाण्यातील कर्मचारी पेंदोर, प्रवीण चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.