वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथील खून प्रकरणात आणखी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता आरोपीची एकूण संख्या ११ झालेली आहे, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता बुधवार (ता.१६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सेलू (मु.) येथे जमावाद्वारे आकाश उल्हेश उईके( ३२) या गुन्हे प्रवृत्तीच्या युवकास बुधवारी (ता.९) रात्री १० वाजता चे दरम्यान बेदम मारहाण करण्यात आलेली होती. त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक आकाशने घटनेच्या दिवशी आरोपीची सायकल पाडून भांडण उकरून काढले होते. मृतकाच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी त्याला दगड व लाठीकाठीने मारहाण करीत त्याला जीवाने संपविले होते. याप्रकरणात १० ते १५ आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलिसात खुनाचा गुन्हा दाखलकरण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी गजानन खडसे (३८), पांडुरंग देवतळे (४४),प्रकाश खडसे (४४) आणि शरद सातपुते (४४) या चार आरोपीला तात्काळ अटक केली. चौकशीत आणखी आणखी सात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. यात जितेंद्र सुभाषराव गौळकार ( ३३), चंद्रशेखर राजूजी मांडवकर (२५ ), वैभव बबनराव धोटे (२०), धनराज वसंतराव छापेकर ( ३०), अतुल शंकरराव गौळकार ( २८) , गोपाल सोनू पवार (२६) आणि आकाश बंडूजी भांडेकर ( २६ )यांना अटक करण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.