लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण राज्यातील नागरिकांसह आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींसाठी चर्चेचा विषय ठरत असलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात-भ्रूणहत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी पत्र दिल्यावर आरोग्य विभागाच्या चमूने शनिवारी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डची तपासणी केली. ही रेकॉर्ड तपासणी मोहीम मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली असून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. रेकॉर्ड तपासणीचा सविस्तर अहवाल बुधवार १९ जानेवारीपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर होण्याची शक्यता आहे.आरोग्य संचालक देणार कदम हॉस्पिटलला भेट?- आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शनिवारी सायंकाळी नागपूर येथील प्रभारी उपसंचालक रविशेखर धकाते यांनी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या रेकॉर्ड तपासणीची पाहणी करून अवैध गर्भपात-भ्रूणहत्या बाबतची अधिकची माहिती जाणून घेतली. असे असले तरी सोमवारी आरोग्य विभागाच्या पुणे येथील संचालक अर्चना पाटील या स्वत: आर्वी गाठून कदम हॉस्पिटलची माहिती जाणून घेण्याची शक्यता आहे.
सीएसला अहवाल मिळाल्यावर होणार पुढील कार्यवाही- तालुकास्तरावरून कदम हॉस्पिटलचा रेकॉर्ड तपासणीचा सखोल अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर होणार आहे. त्यानंतर विविध त्रुटी आढळलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर कायदेशीर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या अधिकाऱ्यांची होती प्रत्यक्ष हजेरी- शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजेपर्यंत कदम हॉस्पिटलमधील रेकॉर्ड तपासण्यात आले. हे रेकॉर्ड तपासणी ऑनकॅमेरा झाली असून याप्रसंगी आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनीषा नासरे, फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. राजेश कुडे, कांचन बडवानी, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, नायब तहसीलदार विनायक मगर आदींची उपस्थिती हाेती.