अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन : तोडगा न निघाल्यास बेमुदत राज्यव्यापी संपाचे आवाहन वर्धा : केंद्र व राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्याची आश्वासने दिली; पण ती हवेत विरली. यामुळे आक्रमक अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आक्रोष आंदोलन सुरू केले. विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री व पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले. दुर्लक्ष केल्यास तेथेच मुक्काम करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम केला. दरम्यान, आंदोलनाला जि.प. सदस्य मनीष पुसाटे, अनिस राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, धम्मा खडसे, गोपाल काळे, एमएसइबी वर्कर्स फेडरेशनचे रमेश बोदलकर, किसान सभेचे मारोतराव डमडवार, आशा कर्मचारी संघटनेच्या राज्य सहसचिव सुजाता भगत, जिल्हा सचिव प्रमिला वाघमारे यांनी भेटी दिल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली होती; पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात घेत त्यांच्या मानधनात वाढ करावी. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांपेक्षा अधिक मानधन द्यावे. मानधनात दरवर्षी ५ टक्के वाढ करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन द्यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक महिन्याची पगारी उन्हाळी सुटी देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्यात. या मागण्यांवर ३० मार्चपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास १ एप्रिल २०१७ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. जिल्हा कचेरीसमोरील आक्रोष आंदोलनाचे नेतृत्त्व आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक अस्लम पठाण यांनी केले. आंदोलनात विजया पावडे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, सुनंदा आखाडे, शोभा सायंकार, रेखा काचोळे, शोभा तिवारी, नलिनी चौधरी, बबीता चिमोटे, विमल कौरती, रंजना तांभेकर, वंदना खोब्रागडे, सुनीता टिपले, माला भगत, हिरा बावते, सीमा गढिया, वंदना बाचले, प्रज्ञा ढोले यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात रात्र काढल्यानंतर मुक्काम आंदोलनाचा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन शबाना शेख यांनी केले तर आभार दुर्गा गवई यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी) कार्यालयात महिलांसाठी जेवणाची व्यवस्था अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या मुक्कामी आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच महिलांची जेवणाची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती. शिवाय तेथेच मुक्काम करावयाचा असल्याने बिछाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रास्त मागण्या पदरात पाडून घेण्याकरिता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. तत्पूर्वी, सोमवारी या मुक्कामी आक्रोष आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या महिलांनी थाळी वाजवून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, हे आश्वासन शासनाने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले.
सेविकांचा रात्री जिल्हा कचेरीत मुक्काम
By admin | Published: March 22, 2017 12:39 AM