आठ दिवसांपासून ठप्प विद्युत पुरवठा खंडित : अभियंत्यांकडून टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : शिवणफळ गावाला अनियमित वीज पुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाली आहे. अघोषित भारनियमन व अपुरा पाणीपुरवठा यामुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. यात भर म्हणून रोहित्र जळाल्याने तब्बल आठ दिवसांपासून नळाचा पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायतने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात रोहित्र दुरस्ती करण्यासंदर्भात तक्रार अर्ज केल्यावरही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. दुरुस्तीबाबत कर्मचारी व अभियंत्याकडून चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येथील पाणी पुरवठा किती दिवस बंद राहील याची माहिती नसल्याने ग्रामस्थांत संभ्रम आहे. गिरड येथील वीज वितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे असल्याने गावकरी त्रस्त झाले आहे. शिवणफळ गावात १०० घरांची वस्ती आहे. रोहित्रावरुन २० मोटरपंपला जोडणी दिली आहे. यापूर्वी शेतीतील विहरीवरच्या पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी दोन स्वतंत्र रोहित्र दिले होते. मात्र वीज पुरवठा करणारे संच सुरु न करताच येथील रोहित्र दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे गावातील रोहित्रावर घरगुती तसेच विहिरीवरील मोटरपंपांना पुरवठा करण्याचा ताण पडला. रोहित्राच्या संचावर असलेल्या घरगुती वापराच्या वस्तू जळण्याच्या प्रकार यामुळे घडला. ग्रामस्थांनी याबाबतही संबधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्या. याचाही काही उपयोग झाला नाही. येथे रोहित्र बसविण्याची मागणी दोन वर्षांपासून होत आहे. गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यावरही उपयोग झाला नाही. अखेर येथील रोहित्र जळाले. वीज वितरण विभागाकडे रोहित्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. येथील पाणीपुरवठा योजना प्रभावीत झाली असून रोहित्राची तातडीने दुरस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिवणफळचा पाणीपुरवठा
By admin | Published: July 06, 2017 1:16 AM