लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. यामुळे नागरिक संतप्त असून गावाचा विकास करून मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले आहे.वॉर्ड क्र. ४ खापेकर ले-आऊट सेवाग्राम येथे पाणी सुविधा, रस्ते बांधकाम, नाल्यांची सुविधा नाही. कचऱ्याकरिता घंटागाडी देण्यात आली नाही. ओपन स्पेसचा विकास करण्यात आला नाही. या वॉर्डात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रस्ते तथा नाल्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही. केंद्र व राज्य शासनाने २६६ कोटी रुपये सेवाग्राम आराखड्याकरिता मंजूर केले; पण एकही रुपयांचा निधी लोकवस्तीकरिता देण्यात आलेला नाही. देशातच नव्हे तर जगात हे स्थळ प्रसिद्ध आहे; पण राजकीय तथा व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सेवाग्राम येथील नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक देशमुख, बाबा धाबर्डे, पूजा देशमुख, देवढे, मोहन वाघमारे, सविता ढोणे, वैशाली देशमुख, स्वाती माळोदे, आकाश वाघाडे, नागेश्वर तिवारी, पुरूषोत्तम भोयर, राजेंद्र भोयर, वंदना राऊत, जोशी आदींनी निवेदनातून केली आहे.
सेवाग्राम विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 10:02 PM
स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही.
ठळक मुद्देखापेकर ले-आऊटमध्ये समस्या : नागरिकांचे प्रशासनाला साकडे