दिलीप चव्हाण
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी किचकट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून एका ५१ वर्षीय पुरुषाच्या गळ्यातून तब्बल ७.५ किलो मांसाचा गोळा काढला. ही किचकट शस्त्रक्रिया अनेक प्रकारची सावधगिरी बाळगत तब्बल सहा तास चालली हे विशेष.
गडचिरोली येथील एका ५१ वर्षीय पुरुषाच्या गळ्याजवळ टरबुजाच्या आकाराची गाठ आली. मागील १५ वर्षांपासून या गाठेचा त्रास सहन करीत ते आपले जीवन जगत असतानाच त्यांनी विदर्भातील विविध रुग्णालये गाठून उपचार घेतले. परंतु, दिवसेंदिवस या गाठीचा आकार वाढत होता. अखेर या व्यक्तीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय गाठून डॉक्टरांना त्याची माहिती देत उपचार करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉक्टरांनीही आवाहन स्वीकारून १४ जानेवारीला सहा तासांची किचकट यशस्वी शस्त्रक्रिया करून या व्यक्तीच्या गळ्याजवळील ही गाठ काढली.
ही शस्त्रक्रिया डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. सुधा जैन यांच्या मार्गदर्शनात डॉ. पुजा बत्रा, डॉ. प्रकाश नागपुरे, डॉ. रमेश पांडे, डॉ. रिचा गोयल, डॉ. इम्रान यांनी केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. मृणालिनी फुलझेले आणि डॉ. निखिल यांनी सहकार्य केले.
गाठ मानेच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांवर असल्यामुळे अत्यंत सावधगिरीने शस्त्रक्रिया करावी लागली. एकूणच ही शस्त्रक्रिया खूप अवघडच होती. पण शर्तीच्या प्रयत्नाअंती ही गाठ काढण्यात आली आहे.
- डॉ. पुजा बत्रा.
लाळ ग्रंथीतून निर्माण होणारी गाठ काढणे खूप किचकट काम होते. ही शस्त्रक्रिया जगातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रियेपैकी एक आहेच.
- डॉ. रमेश पांडे