कुलूप लागले : उन्हाळ्याच्या दिवसात खेळाडूंसह नागरिकही त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील सिव्हील लाईन भागातील न.प.च्या मालकीचा जलतरण तलावातील फिल्टर प्लांट नादुरूस्त असल्याचे कारण पुढे करत सदर जलतरण तलावाला कुलूप लावण्यात आले आहे. येथे सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. या तलावातील फिल्टर प्लांट तात्काळ दुरूस्त व्हावा याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने चक्क खेळाडू प्रवृत्तीलाच खो मिळत आहे. जलतरण तलाव तात्काळ सुरू करावा अशी मागणी आहे.स्थानिक जलतरण तलावात जवळपास ५० खेळाडू दररोज सराव करतात. स्विमींगमुळे चांगला व्यायाम होत असल्याने येथे जलक्रीडा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. येथे डॉक्टरही मोठ्या प्रमाणात नेहमी पोहण्याकरिता येतात. परंतु, ज्या वेळी तलाव तयार करण्यात आला तेव्हापासून येथील फिल्टर प्लांट मधील पाणी स्वच्छ करण्याचे यंत्र बदलविण्यात आले नाही. वास्तविक पाहता ते यंत्र दर दहा वर्षानंतर बदलविणे गरजेचे असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अशुद्ध पाण्यातच नागरिकांना करावी लागत होते. याबाबतच्या बऱ्यापैकी तक्रारीही संबंधीतांना प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनासोबत पत्रव्यव्हार करण्यात आला. पण, त्याचीही योग्य दखल न घेण्यात आल्याने गत आठ दिवसांपूर्वी सदर जलतरण तलावाला कंत्राटदाराने कुलूप लावले. या जलतरण तलावात खेळाडू सराव करीत असल्याने तो तातडीने सुरू व्हावा अशी मागणी आहे.मुख्य द्वारावर लावला सूचनाफलकयेथील जलतरण तलावाच्या मुख्य द्वारावर पोहोण्यासाठी येणाऱ्यांना जलतरण तलाव कुठल्या कारणावरून बंद आहे याची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात आला आहे. तसेच बंद असलेल्या कालावधी समोर सभासदांना वाढवून देण्यात येईल असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.पोहोण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींना सवलत दिली जाते.तीन वर्षांकरिता दिले होते कंत्राटयेथील जलतरण तलाव चालविण्याचा कंत्राट शांती हरिक्रिष्णन नामक संस्थेला तीन वर्षांकरिता देण्यात आला आहे. कंत्राटदाराकडून सभासदांना अल्प मोबदल्यात पोहण्यासाठी पंधरा दिवसीय, मासिक, त्रि-मासिक, अर्थवार्षिक तसेच वार्षिक पास दिल्या जाते. येथे प्रशिक्षकही नेमण्यात आला आहे. परंतु, फिल्टरच्या नादुरूस्तीमुळे चक्क जलतरण तलावालाच कुलूप लावण्याची वेळ आल्याने खेळाडूंसह नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. परिणामी, योग्य दखल घेण्याची गरज आहे.महिलांना ५० टक्के सूटजलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांकडून कंत्राटदार अल्प मोबदला घेत. खेळाडूंसाठी सायंकाळी ७ ते ९ ही वेळ राखीव ठेवण्यात आली होती. तसेच सदर जलतरण तलावात पोहोण्यासाठी येणाऱ्या महिलांना प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.नवीन फिल्टर यंत्रासाठी ७० लाखाचा खर्चसिव्हील लाईन भागातील जलतरण तलावातील फिल्टर यंत्र तलावर सुरू झाल्यापासून बदलविण्यात आला नाही. दर दहा वर्षांनी तो बदलविणे गरजेचे असते. सध्या जलतरण तलावातील फिल्टर यंत्राची दैना झाली असून नवीन यंत्रासाठी ७० लाखाचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.जलतरण तलावाचा कंत्राट आपणाला तीन वर्षांकरिता मिळाला आहे. येथे येणाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. ज्या सभासदांकडे पोहोण्यासाठी देण्यात आलेल्या पासेस आहेत त्यांना जलतरण तलाव सुरू झाल्यानंतर मुदत वाढ देण्यात येईल.- हरि क्रिष्णन, संचालक, शांती हरिक्रिष्णन संस्था.जलतरण तलावातील फिल्टर यंत्र नादुरूस्त असल्याने ते सध्या बंद आहे. जलतरण तलावातील फिल्टर यंत्र तलाव सुरू झाल्यापासून बदलविण्यात आले नाही. ते बदलविण्यात यावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संबंधीतांकडेही निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- अजय बागरे, प्रशासकीय अधिकारी न.पं. वर्धा.
जलतरण तलावाचा फिल्टर प्लांट नादुरूस्त
By admin | Published: May 25, 2017 1:04 AM