भास्कर कलोडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा जिल्ह्याला गांधीजी व विनोबांचा वारसा लाभला असल्याने त्यांचे विचार हे सातासमुद्रापार पोहोचले आहे. त्यामुळेच या जिल्ह्याचे देशपातळीवर नावलौकीक आहे. आता तर येथील नर्सरीत उगविलेल्या रोपांची विदेशातही निर्यात होऊ लागल्याने हे रोप मोठे होऊन विदेशात सावली देणार आहे.हिंगणघाट येथील दिगांबर खांडरे यांची राष्ट्रीय महामार्गावरील वणानदी लगत ३५ एकर शेती आहे. त्यांनी या शेतीत सुरुवातीला १० हजार फुट जागेवर स्नेहल नर्सरी तयार केली. १९९२ पासून सुरु झालेली ही नर्सरी दिवसेंदिवस बहरतच गेली. त्यांच्याकडील शेती कमी पडू लागल्याने त्यांनी ३० एकर शेती किरायाने घेतली आहे. आता ही नर्सरी तब्बल ५५ एकर परिसरात पसरली आहे. या नर्सरीत जवळपास ५०० ते ५५० प्रजातीचे ५५ ते ६० लाख रोप उपलब्ध आहेत. १ फुटापासून तर १५ फुटांपर्यंत असलेल्या या रोपांना व झाडांना मोठी मागणी आहे. या नर्सरीतून महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा यासह आता विदेशातही रोपांचा पुरवठा केल्या जातो. नुकताच या नर्सरीतील बांबूचे ६ ते ८ फुट उंचीचे १५०० तर पहाडी भागाला हिरवे गार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वडेलिया या प्रजातीचे ५ लाख रोपे ब्राझीलला पाठविण्यात आले आहे. या रोपांची लागवड ब्राझीलच्या एका रिसॉर्टमध्ये केली जाणार आहे. जयपूर येथील संस्थेच्या माध्यमातून या रोपांची मागणी नोंदविण्यात आली होती. स्नेहन नर्सरीतून इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची निर्यात केल्याने त्यांच्या नर्सरीकडे अनेकांचा ओघ वाढला आहे.
वृक्षाबद्दलची आवडच झाली व्यवसायस्नेहल नर्सरीचे मालक दिगांबर खांडरे हे वनविभागात लेखापाल म्हणून कार्यरत होते. त्यांना वृक्षाबद्दल आवड असल्याने त्यांनी १९९२ मध्ये नर्सरी सुरु केली. पण, नर्सरीतील हिरवळ पाहून दिगांबर यांचे मन नोकरीत रमत नव्हते त्यामुळे त्यांनी २००३ मध्ये नोकरी सोडून पुर्णवेळ नर्सरीकडेच लक्ष केंद्रीत केले. त्यांना आता कृषी पदविका प्राप्त असलेले शशांक व शुभांक हे दोन्ही मुल मदत करीत आहे. मोठा मुलगा शशांक हा नर्सरीची देखभाल तर लहान मुलगा शुभांक हा माकेटींग सांभाळतो. या तिनही बापलेकांच्या मेहनतीने त्यांच्या या नसरी व्यवसायातून वर्षाकाठी अडीच ते तीन कोटींची उलाढाल होते. दिगांबर खांडरे यांच्या या अलौकीक कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार व सुंदलाल बहूगुणा हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार नर्सरीतून रोपांचा पुरवठा केल्या जातो. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी रोप पोहोचवून देण्याची आमची जबाबदारी असून ती चोखपणे पार पाडत असल्याने रोपांचीही मागणी वाढत आहे. नुकाताच मागणीनुसार ब्राझीललाही रोपे पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्रातून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची निर्यात होत असावी.दिगांबर खांडरे, शेतकरी, हिंगणघाट
वर्षभरासाठी ७० मजुरांना दिला रोजगारशासकीय नोकरी सोडून जमिनीवर हिरवळ फुलविण्यासोबतच इतरांच्याही आयुष्यात हिरवळ फुलवावी, यासाठी मजुरांना जवळ केले. त्यांनी वर्षभरासाठी ६५ ते ७० मजुरांना रोजगार दिला आहे. यातील पन्नास टक्के मजूर स्थानिक तर पन्नास टक्के मजूर बाहेरील असल्याचे सांगण्यात आले आहे. या नर्सरीमुळे या मजुरांना नियमित रोजगार मिळत असल्याने त्यांचेही जीवन सुखकर झाले आहे.
हिंगणघाट सारख्या लहानशा शहरात इतकी मोठी नर्सरी तयार करुन त्यात विविध प्रजातीचे लाखो रोप व वृक्ष आहेत. दिगांबर खांडरे यांनी उत्तमरित्या ही नर्सरी फुलविली असून येथील रोप विदेशात पाठविणे ही गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या हे कार्य इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.समीर कुणावार, आमदार हिंगणघाट.