महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 08:36 PM2022-09-15T20:36:18+5:302022-09-15T20:36:56+5:30
Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.
अभिनय खोपडे
वर्धा : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.
या बैठकीला महाराष्ट्राचे काँग्रेसचे निवडणूक अधिकारी पल्लम राजू, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून प्रदेश प्रतिनिधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असलेले दिलीप येडतकर यांचे नाव सुचविण्यात आले होते. या नावावर अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे नोंदविला होता. त्यांचे नाव आर्वी शहरातून पाठविण्यात आले होते. त्यानंतर हे नाव रद्द करून आर्वी येथून प्रेम पालिवाल यांचे नाव घेण्यात आले व काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने अग्रवाल यांचे किसान काँग्रेसमधील राष्ट्रीय स्तरावरील काम लक्षात घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नाव समाविष्ट केले आहे. अग्रवाल यांच्या नावामुळे जिल्ह्यातील प्रस्थापित काँग्रेस नेत्यांना धक्का लागणार आहे.