ज्ञानेश्वर वाकुडकर : विदर्भ लोकरत्न सन्मान जाहीरहिंगणघाट : अमाप लोकसंपदा मिळवत या महाराष्ट्राला वऱ्हाडी भाषेची गोडी लावून निखळ विनोदाने ज्यांनी खळखळून हसविले आणि त्याचवेळी संवेदनशील कवितांनी समाज मन सुन्न केले. पायावर मस्तक ठेवावे असा जर कोणता कवी असेल ते म्हणजे शंकर बढे होय, अशा भावना प्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केल्या. लोकसाहित्य परिषद व वंजारी समाज परिषदेद्वारे कविवर्य स्व. शंकर बढे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर लोकसाहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र चाफले, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, प्रा. शेषकुमार येरलेकर, वसंत हमंड, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पखाले, कवी जयंत चावरे, सुधाकर हेमके, अभिजीत डाखोरे, जितेंद्र केदार उपस्थित होते. प्रारंभी कवी सुधाकर हेमके, केशव नाक्षिणे, मुरली लाहोटी, अश्विनी नरड, लीना शेंडे, मनीषा रिठे, नीलिमा घिनमिने, कवी मुगल बेग यांनी रचना सादर करून श्रद्धांजली अर्पण केली. यवतमाळचे साहित्यिक नितीन पखाले यांनी शंकर बढे यांचा जीवन प्रवास उलघडून दाखविला. साहित्य संपदेपेक्षा लोकसंपदेवर विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविणारे शंकर बढे हे पहिले साहित्यिक आहे. वऱ्हाडी भाषेला खऱ्या अर्थाने न्याय देत ग्रामीण व्यक्तिचित्रण हुबेहूब सादर करणारे शंकर बढे वऱ्हाडी रत्न आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कवी जयंत चावरे यवतमाळ यांनी कवितेने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कवितांनी सभागृहाला रडायला भाग पाडले. शंकर बढे यांच्यापासून प्रेरणा, प्रोत्साहन मिळाली व आज जे काही मी लिहितो, ते सगळं बढे काकांची देण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वऱ्हाडी बोलीला अवीट गोडी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला या अवीट गोडीची चव चाखायची संधी बढे यांच्या साहित्याने दिली. कमी शब्दात भावना व्यक्त करण्याचे कसब बढे यांच्याजवळ होते, असे वाकुडकर म्हणाले. यावेळी त्यांनी कविता सादर करून श्रद्धांजली वाहिली. ज्ञानेश्वर चौधरी यांनी लोकसाहित्य परिषदेद्वारे यावर्षीपासून देण्यात येणारा ‘विदर्भ लोकरत्न’ हा सन्मान स्व. शंकर बढे यांना मरणोत्तर जाहीर केला. जानेवारीत तो प्रदान करण्यात येईल. एक गौरव ग्रंथ काढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. संचालन प्रा. डाखोरे यांनी केले. कार्यक्रमाला मनोहर ढगे, गिरीधर कचोळे, प्रकाश कहूरके, आशिष भोयर, छत्रपती भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरू, उमेश मानकर, विजय धात्रक, सतीश चौधरी, ज्ञानेश्वर वाघमारे आदींनी सहकार्य केले. सांगता संगीत विशारद विजय गावंडे यांच्या पसायदानाने झाली.(तालुका प्रतिनिधी)
अमाप लोकसंपदेचा समाजमन सुन्न करणारा कवी ‘शंकर बढे’
By admin | Published: September 14, 2016 12:51 AM