पराग मगर वर्धादगड फोडून त्याला आकार देऊ न वरवंटे पाटे बनविण्याचा वारसा माय-बापापासून मिळाला. आजतागायत हे काम सुरू आहे. आतापर्यंत कित्येक दगडांना आकार दिला. पण जीवनाला आकार देण्याचे राहूनच गेले अशी वास्तववादी सल दगड फोडून वरवंटे-पाटे व जाते बनविणारे नारायण मुळे व्यक्त करतात. त्यांचा मुक्काम म्हणावा तो रस्त्याच्या कडेला. आजूबाजूला केवळ खरपाचे दगड, प्लास्टिकची झोपडी, साथ देणारी बायको आणि काही जुजबी साहित्य. शिक्षणाचा गंधही नसलेले नारायण मुळे बालपणापासून दगड फोडून वरवंटे पाटे बनविण्याचे काम करतात. याच भरवशावर मुलांचे शिक्षण मुलींची लग्न केली. संसार पोसला. मुलांनी या व्यवसायात साथ दिली असती तर कामं हलकी झाली असती. पण त्यांची साथ न लाभल्याने एकट्यालाच हा व्यवसाय करावा लागल्याचे मुळे सांगतात. जबलपूरवरून ते खरपाचा दगड आणतात. यापासून वरवंटे व पाटे तयार केले जातात. वरवंटे-पाटे तयार करून ते जिल्हाभर विकतात. सावलीच्या ठिकाणी साहित्य ठेवायचे आणि पाटे तयार करायचे हा त्यांचा दिनक्रम. त्यांची पत्नी बनविलेले वरवंटे पाटे परिसरात नेऊन विकते. दिवसभरात दोन ते तीन पाटे वरवंटे ते तयार करतात. मुळेंनी साठी ओलांडली आहे. पण शासनाच्या योजनांचा कुठलाही लाभ त्यांना आतापर्यंत मिळालेला नसल्याचे ते सांगतात. तसेच मेहनतीच्या मानाने अत्यल्प पैसा मिळत असल्याची खंतही ते व्यक्त करतात. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
दगडाला आकार दिला, जीवन राहूनच गेले
By admin | Published: April 05, 2015 2:07 AM