वर्धा: अखेर महाविकास आघाडीत हिंगणघाटची जाग राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला सुटली आहे. लागलीच पक्षाने रविवारी अतुल वांदिले यांना उमेदवारी घोषित करून प्रस्थापितांपुढे आव्हान निर्माण केले आहे.
महाविकास आघाडीत आता चारही जागांचा तिढा सुटला आहे. वर्धा आणि देवळी काँग्रेसला, तर आर्वी आणि हिंगणघाट मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला गेला आहे. यापूर्वी भाजपने वर्धा, हिंगणघाट आणि देवळीचे उमेदवार घोषित केले होते. नंतर काँग्रेसने देवळी आणि शनिवारी वर्धेचा उमेदवार घोषित केला. शनिवारीच राष्ट्रवादी शरद पवार गटाने आर्वीचा उमेदवारही घोषित केला.
रविवारी पुन्हा हिंगणघाटमधून अतुल वांदिले यांची उमेदवारी घोषित केली. वांदिले यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित आमदारांसमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या दोन टर्मपासून भाजपचे समीर कुणावार आमदार आहे. आत्तापर्यंत त्यांना तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. मात्र, यावेळी वांदिले यांच्या रूपाने शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. त्यांनी नव्या दमाच्या तरुणाला उमेदवारी देऊन विद्ममान आमदारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
महाविकास आघाडीत हिंगणघाट मतदारसंघाबाबत आत्तापर्यंत तिढा होता. मात्र, आता सुटला असून, एकसंघ महाविकास आघाडी भाजपच्या उमेदवाराला घाम फोडण्याची शक्यता आहे. आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेना मिळून प्रस्थापित भाजप उमेदवारासमोर यावेळी भक्कम आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपची या मतदारसंघावरील पकड कमी झाली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्या उमेदवारावर आघाडी घेतली होती. तेव्हापासूनच मतदारांचा कल स्पष्ट झाला. आता शरद पवार यांनी नवा गडी हेरून उमेदवारी जाहीर केल्याने तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहे.
लोकसभेत २० हजारांची आघाडीगेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना ९५ हजार ३५ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार रामदास तडस यांना ७४ हजार ४८० मते मिळाली होते. काळे यांनी तब्बल २० हजार ५५ मतांची आघाडी घेतली होती. लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास भाजप उमेदवारापुढे मोठे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.