वर्धा : राज्यातील आदिवासीबहुल गडचिरोली, गोंदिया, चंदपूर, नागपूर, अमरावती, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांच्या ८०० प्रतिनिधींसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सेवाग्राम येथे संवाद साधणार आहेत. यावेळी सामूहिक वनहक्क व उपजीविका, वन व जलसंधारणावर झालेले कार्य, अडचणी व उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.
राज्य पातळीवर एकत्रित कार्य करण्यासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळात विदर्भातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा, महासंघ व संस्था प्रतिनिधी यांची सभा गांधी आश्रम येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सामूहिक वनहक्क उपजीविका या विषयासंदर्भात दिलीप गोडे, प्रतिभा शिंदे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ.किशोर मोघे मार्गदर्शन करतील.
राज्यात वनहक्क २००६ व नियम २००८ पासून जवळपास ७ हजार गावांना ३० लाख एकर वनजमीन व जलस्रोतावर सामूहिक हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. १३ ते १४ लाख कुटुंब व ७० लाख नागरिक यांना वनावर स्वामित्व हक्क मिळालेले आहे. यातील बहुतांश नागरिक आदिवासी व वन निवासी आहेत. त्यांची उपजीविका शेती आणि जंगलातील वन उपज यावर अवलंबून आहे. जल,जंगल, जमीन यांचे एकत्रित व सामूहिक व्यवस्थापन केले तर मोठ्या प्रमाणात गावांना आर्थिक लाभ होईल व रोजगार निर्मिती होईल. यासाठी विदर्भ उपजीविका मंच व सर्व मित्र संस्था १००० हून अधिक गावात काम करीत आहेत.